देऊळगाव राजा ः खडकपूर्णा प्रकल्पांतर्गत येणाऱ्या संत चोखामेळा जलाशय परिसरात शासनाचा महसूल बुडवून अवैधरीत्या रेतीचा उपसा करणाऱ्यांविरोधात देऊळगाव राजा पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत अवैध रेती उपशासाठी वापरण्यात येणाऱ्या दोन बोटींसह सुमारे 27 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल शासकीय पंचासमक्ष नष्ट करण्यात आला.
सदरची कारवाई माननीय पोलिस अधीक्षक नीलेश तांबे, अप्पर पोलिस अधीक्षक अमोल गायकवाड तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी मनीषा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलिस निरीक्षक ब्रह्मगिरी यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलिस निरीक्षक हेमंत शिंदे, सहायक उपनिरीक्षक शिवदास गिते, पोलिस हवालदार रामकिसन गिते, माधव कुटे, विजय दराडे, पोका. ज्ञानेश्वर वायाळ, पोका. प्रवीण डोईफोडे, गजानन काकड यांच्यासह महसूल विभाग व खडकपूर्णा प्रकल्पाच्या कर्मचाऱ्यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली.
18 जानेवारी 2026 रोजी सकाळी 9 वाजताच्या सुमारास, मेव्हना राजा शिवारातील खडकपूर्णा जलाशय परिसरात गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी छापा टाकला. यावेळी अज्ञात बोट चालक व अज्ञात मालक हे त्यांच्या मालकीच्या दोन बोटींच्या माध्यमातून जलाशयात अवैधरीत्या रेतीचा उपसा करून चोरी करत असल्याचे निदर्शनास आले. घटनास्थळी अवैध गौण खनिज तसेच चोरीसाठी वापरण्यात येणारे साहित्य आढळून आले.
या प्रकरणी गौण खनिज अधिनियमाच्या विविध कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोका. प्रवीण मदन डोईफोडे यांनी यासंदर्भात फिर्याद दिली. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलिस हवालदार शरद साळवे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. देऊळगाव राजा पोलिसांनी केलेल्या सततच्या या कारवाईमुळे वाळूमाफियांचे धाबे दणाणाले आहे.
कारवाई सुरूच राहणार
अवैध रेती उपसा रोखण्यासाठी पोलिस व प्रशासनाने कारवाई हाती घेतली आहे. भविष्यातही अशा बेकायदेशीर कृत्यांविरोधात कारवाई सुरूच राहणार आहे. असे पोलिसांनी सांगितले. यामुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले आहे.