

परतूर ः केंद्र सरकारने केलेल्या व्हीबी - जी-राम-जी कायदा व बजेट कपातीच्या विरोधात महाराष्ट्र शेतमजूर व इतर ग्रामीण मजूर युनियन (लालबावटा) संघटनेच्यावतीने सोमवार (दि.19) रोजी परतूर उपविभागीय अधिकरी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. यावेळी मनरेगा वाचवा रोजगार वाचवाचा नारा सहभागी मोर्चेकऱ्यांनी दिला.
दरम्यान, लाल झेंडे हातात घेऊन परतूर तालुक्यातील विविध गावचे मजूर महिला, पुरुष या मोर्चामध्ये सहभागी झाले. महागाई वाढत आहे. शेतीवरील कामाचे दिवस कमी झाले आहे. अशावेळी रोजगार हमी वरील बजेट वाढवणे आवश्यक असताना, केंद्र सरकारने रोजगार हमी तील 40 टक्के बजेट कपात केले आहे. ही कपात म्हणजे ग्रामीण मजुरांच्या हातचा रोजगार बंद करण्याचे सरकारचे कटकारस्थान असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला.
दुसरीकडे उद्योगपतींना लाखो कोटी रुपयांचे अनुदान सरकार देत आहे , सरकारी जमिनी, सरकारी उद्योग,नैसर्गिक जल जंगल जमीन उद्योगपतींना सरकार फुकट मध्ये देत आहे,आणि दुसरीकडे मात्र हातावर पोट घेऊन जगणाऱ्या माणसासाठी साधा रोजगार हमीचा कायदा सुद्धा सरकारला ठेवू वाटत नाही.