

संघपाल वाहूळकर
जालना : भारतीय जनता पार्टीने महापालिकेच्या निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला. भाजपाने 65 पैकी 41 जागेवर निर्विवाद वर्चस्व स्थापन केले आहे. महापौर भाजपाचाच होईल, हे स्पष्ट झाले असून, आता गुरुवार दि. 22 रोजी महापौर पदाची आरक्षण सोडत होणार आहे. आरक्षण जाहीर झाल्यानंतरच जालन्याचा प्रथम नागरिक तथा पहिला महापौर कोण होणार याकडे जालनेकरांच्या नजरा लागल्या आहेत.
दरम्यान, जालना महापालिकेच्या निवडणुकीत भाजपाने स्वबळ आजमावले. माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे,माजी आमदार कैलास गोरंट्याल, भाजपाचे जिल्हा महानगर अध्यक्ष भास्कर दानवे यांनी महापालिकेच्या पहिल्या वहिल्या निवडणुकीत सत्ता स्थापन करण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले. आता गुरुवारी (दि.22) रोजी राज्यातील महानगर पालिकांमधील महापौर पदाचे आरक्षण निश्चित करण्यासाठी नगर विकास खात्याच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आरक्षण सोडत काढली जाणार आहे. त्यानंतर कोणत्या प्रवर्गाला आरक्षण सुटते ते कळणार आहे. शिवाय, महिला की सर्वसाधारण याचाही पडदा उघडणार आहे. तशा पध्दतीने भाजपाने आपली तयारी पूर्ण केली आहे.
सर्वसाधारण प्रवर्गाला आरक्षण सुटल्यास भाजप महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर दानवे, ओबीसी महिलांमधून त्यांच्या पत्नी सुशिला दानवे महापौर पदाच्या दावेदार मानल्या जात आहे. तर भाजपाच्या यशामध्ये महत्त्वाचा वाटा उचलणारे माजी आमदार कैलास गोरंट्याल कुटुंबातून त्यांच्या पत्नी संगीता गोरंट्याल व मुलगा अक्षय गोरट्याल हे दोन उमेदवार देखील महापौरपदाचे दावेदार असल्याची चर्चा आहे.
संगीता गेोरंट्याल या ओबसी महिला प्रवर्गातून तर अक्षय गोरंट्याल यांनी ओबीसी प्रवर्गातून निवडणूक जिंकली आहे. तर पांगारकर कुटुंबातून देखील भाजपाचे एकनिष्ठ असलेले अशोक पांगारकर व त्यांच्या भावजयी अनामिका पांगाकर यांच्याकडून देखील महापौरपदावर दावेदारी दाखल केली जाऊ शकते. सध्या तरी जालनेकरांच्या चर्चेला उधाण आले आहे. अजून एका दिवसानंतर आरक्षण जाहीर झाल्यानंतर सर्व चित्र स्पष्ट होणार आहे.
उपमहापौर निवडीनंतर समित्यांची रचना
महापौर पदासाठी राज्य शासनाकडून गुरुवारी आरक्षण निश्चित केले जाणार आहे. त्यानंतर महापालिकेतील राजकीय हालचालींना वेग येणार आहे. आरक्षण जाहीर झाल्यानंतर सर्वप्रथम महापौर पदासाठी निवडणूक पार पडेल.
त्यानंतर उपमहापौर आणि त्यानंतर महापालिकेतील स्थायी समिती, महिला व बाल कल्याण, बांधकाम, पाणीपुरवठा व स्वच्छता, शिक्षण, आरोग्य यासह इतर महत्त्वाच्या समित्यांची रचना केली जाणार आहे.
दरम्यान, शासनाच्या नव्या नियमानुसार जालना महापालिकेत आता 6 स्वीकृत सदस्यांची देखील भर पडणार आहे. ही तरतूद नगरसेवकांच्या 10 टक्के इतकी आहे. त्यांची देखील निवड केली जाणार आहे.
महापालिकेपुढील आव्हाने
शहरातील भूमिगत गटार व्यवस्थापन सुधारणे
शहरातील वाढते अतिक्रमण
12 दिवसाला होणारा पाणीपुरवठा,
घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प सुरू करणे
शहरातील स्वच्छता अबाधित ठेवणे
सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प सुरू करणे
कुंडलिका - सीना नदीला पुनर्वैभव प्राप्त करणे
मा. फुलंब्रीकर नाट्यगृह दुरुस्त करणे
जलतरण तलाव सुरू करणे
शहरातील आरोग्य केंद्रांना बळकटी देणे
महानगरपालिकेच्या शाळांची स्थिती सुधारणे
जालना शहरमहापालिकेतील पक्षीय बलाबल
भाजप 41
शिवसेना 12
काँग्रेस 9
एमआयएम 2
अपक्ष 1
एकूण 65