Sant Gajanan Maharaj Palkhi Pudhari
बुलढाणा

Ashadhi Wari 2026 | आषाढी वारीसाठी गजानन महाराजांच्या पालखीचे २१ जूनला पंढरपूरकडे प्रस्थान

२३ जुलैरोजी श्रींची पालखी पंढरपूर येथे दाखल होणार

पुढारी वृत्तसेवा

Sant Gajanan Maharaj Palkhi

बुलढाणा : आषाढी वारीनिमित्त संत गजानन महाराज संस्थानच्या पारंपरिक पायदळ पालखीचे २१ जून रोजी शेगाव येथून पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. यंदा हा पालखी सोहळा ५७ व्या वर्षात पदार्पण करत असून, २३ जुलै रोजी श्रींची पालखी पंढरपूर येथे दाखल होणार आहे.

सुमारे ७०० पताकाधारी, टाळकरी आणि वारकऱ्यांच्या सहभागामुळे हा शिस्तबद्ध पायदळ पालखी सोहळा मार्गावरील भाविकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतो. गजानन महाराजांच्या पालखीच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या उत्सुकतेने प्रतीक्षा करत असतात.

२१ जून ते १९ ऑगस्ट या कालावधीत बुलढाणा, अकोला, वाशिम, हिंगोली, परभणी, बीड, धाराशिव, सोलापूर आणि जालना अशा नऊ जिल्ह्यांतून पालखीचा ६० दिवसांचा आणि एकूण १,२०६ किलोमीटरचा प्रवास होणार आहे. २१ जून रोजी सकाळी शेगाव येथील समाधी मंदिर परिसरातून पालखीचे प्रस्थान होईल.

श्रीक्षेत्र नागझरी (अकोला), पातूर, श्रीक्षेत्र डव्हा, शिरपूर जैन, रिसोड, सेनगाव, श्रीक्षेत्र नरसी नामदेव, श्रीक्षेत्र औंढा नागनाथ, श्रीक्षेत्र त्रिधारा, परभणी, गंगाखेड, परळी वैजनाथ, अंबाजोगाई, कळंब, धाराशिव, श्रीक्षेत्र तुळजापूर आणि श्रीक्षेत्र मंगळवेढा या मार्गाने ३३ दिवसांत ७०१ किलोमीटरचे पदक्रमण करून २३ जुलै रोजी पालखी पंढरपूर येथे पोहोचेल.

आषाढी वारीनिमित्त २३ ते २८ जुलै या कालावधीत पालखीचा मुक्काम पंढरपूर येथे राहणार आहे. विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतल्यानंतर २९ जुलै रोजी पालखी शेगावकडे परतीच्या प्रवासाला सुरुवात करेल.

कुर्डुवाडी, बार्शी, भूम, कुंथलगिरी, बीड, गेवराई, जालना, न्हावा, सिंदखेडराजा, लोणार, मेहकर, जानेफळ आणि खामगाव या मार्गाने २७ दिवसांत ५०१ किलोमीटरचा परतीचा प्रवास पूर्ण करून १९ ऑगस्ट रोजी गजानन महाराजांची पालखी शेगाव येथील मंदिरात दाखल होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT