Onion truck Pudhari Photo
बुलढाणा

Buldhana news: समृद्धी महामार्गावर चालकाला मारहाण करून ३० टन कांद्याचा ट्रक पळवला; चौघांना अटक

समृध्दी महामार्गावर कार आडवी लावून ट्रक चालकाला बेदम मारहाण करत कांद्याने भरलेला ट्रक पळवणा-या चार संशयितांच्या महामार्ग पोलिस व डोणगाव पोलिसांनी मुसक्या आवळल्या.

पुढारी वृत्तसेवा

Buldhana news

बुलढाणा : समृध्दी महामार्गावर कार आडवी लावून ट्रक चालकाला बेदम मारहाण करत कांद्याने भरलेला ट्रक पळवणा-या चार संशयितांच्या महामार्ग पोलिस व डोणगाव पोलिसांनी मुसक्या आवळल्या. तेजस विलास ढोमसे, गौरव हरिभाऊ पानसरे, विश्वजीत निवृत्ती ढोमसे व आशूदेव दास ( सर्वजण रा. कोलकाता, प.बंगाल) अशी संशयीत आरोपींची नावे आहेत.

त्यांच्याकडून ३० टन कांद्याने भरलेला ट्रक व गुन्ह्यात वापरलेली एक स्कोडा कार (क्र.एम.एच१५ एच ९००४) पोलिसांनी जप्त केली आहे. या कारला चोरट्यांनी महाराष्ट्र शासन अशी पाटी व सायरन लावलेले आढळले आहे. महामार्गावर प्रवासादरम्यान पोलिसांची धुळफेक करण्यासाठी असा प्रकार केल्याचे दिसून आल्याने तपास अधिक गंभीरपणे केला जात आहे.

ट्रकचालक मिराज अहमद ऐजाज अहमद (वय २८, रा. थोन, जि. कौसंबी, उत्तर प्रदेश) हा ट्रक (क्र. सी जी ०४ पीपी ९११३)द्वारे नाशिक जिल्ह्यातून ३० टन ५६० किलो कांद्याची (किंमत ११लाख ५०हजार) झारखंड राज्याकडे भाडेतत्त्वावर वाहतूक करत होता. शुक्रवारी (दि. २५) रात्री ११.३० च्या सुमारास समृध्दी महामार्गावर मेहकर ते मालेगाव दरम्यान डोणगांव जवळ एका पांढ-या कारमधून आलेल्या अज्ञात चार लुटारूंनी कार आडवी लावून ट्रक अडवला. चालक मिराज अहेमद याला बेदम मारहाण करून त्याच्या ताब्यातील कांद्यासह भरलेला ट्रक (एकूण मुद्देमाल ३६ लाख ५० हजार) पळवून नेला होता. या घटनेने खळबळ उडाली होती.

डोणगाव पोलिसांनी अमानी (ता. मालेगाव) च्या महामार्ग पोलीस चौकीला सतर्क केल्याने पीएसआय प्रकाश सरनाईक यांच्या पथकाने नाकाबंदी केली होती. कांद्याचा ट्रक व संशयित स्कोडा कार अडवून चार संशयितांना ताब्यात घेतले. पोलीस अधिक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनात एसडीपीओ संतोष खांडे, डोणगावचे ठाणेदार गणेश इंगोले, एपीआय राहूल पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली. पुढील तपास डोणगाव पोलीस करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT