Private Veterinary Assistant himself on fire
बुलढाणा: निवृत्तीनंतर खासगी पशू वैद्यकीय परिचर म्हणून व्यवसाय करीत असलेल्या एका व्यक्तीने नांदूरा तालुक्यातील अलमपूर मार्गावर स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेतल्याची घटना नांदूरा तालुक्यातील अलमपूर मार्गावर आज (दि.९) घडली. या घटनेने खळबळ उडाली. चंदू पाटील (वय ७०, रा. पिंपळगावराजा, ता. जळगाव जामोद) असे या गंभीर जळालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
अलमपूर गावाकडे जात असताना वाटेत अचानक दुचाकी थांबवून त्यांनी स्वत:चे अंगावर पेट्रोल ओतले व पेटवून घेतले. आगीच्या ज्वाळा दिसल्यानंतर धावून आलेल्या आसपासच्या लोकांनी अंगावर तात्काळ पाणी टाकून त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला.
त्यांना उपचारासाठी प्रथम खामगाव येथील सामान्य रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, प्रकृती गंभीर झाल्याने पुढील उपचारासाठी अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चंदू पाटील हे पशू वैद्यकीय परिचर म्हणून शासकीय सेवेतून निवृत्त झाल्यानंतर खासगी परिचर म्हणून परिसरात पशू वैद्यकीय व्यवसाय करीत होते. कौटुंबिक कलहातून आलेल्या नैराश्यातून त्यांनी असे टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. पोलिसांत या घटनेची नोंद झाली आहे.