Buldhana Superintendent of Police Vishva Pansare Nilesh Tambe
बुलढाणा: बुलढाणा पोलिस दलात आज (शुक्रवार दि.३०) अभूतपूर्व प्रकार पाहायला मिळाला. जिल्हा पोलिस अधीक्षक पदाच्या खुर्चीवर बसण्यासाठी दोन वरिष्ठ अधिकारी समोरासमोर आले. अर्थात एका पोलिस अधीक्षकांनी पहाटे ७.३० वाजताच आपल्या खुर्चीचा ताबा मिळवला. तर गुरूवारी रात्री २ वाजेपर्यंत कार्यालयीन कामकाज केलेल्या दुस-या पोलिस अधीक्षकांना अखेर अप्पर पोलिस अधीक्षकाच्या दालनात बसावे लागले. एकाचवेळी या दोन्ही पोलीस अधीक्षकांनी कार्यालयीन कामकाज सुरू केल्याने त्यांच्या अधिनस्थ असलेल्या सहका-यांना अवघडल्यासारखे झाले. आदेश कुणाचा ऐकावा? असा जटील प्रश्न उभा ठाकला आहे.
या सर्व घटनाक्रमात 'शिस्तप्रिय' पोलीस खात्याची शोभा झाल्याचे दिसले. अखेर यावर उपाय शोधण्यासाठी अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे बुलढाण्याकडे निघाले आहेत. एकूणच हा गोंधळाचा प्रकार गृह विभागाच्या गलथान कारभारामुळे झाल्याचे बोलले जात आहे. दि. २२ मे रोजी बुलढाण्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक विश्व पानसरे यांची अमरावती येथे एसआरपीचे निदेशक म्हणून बदली करण्यात आली. त्यांच्या जागेवर नागपूर सीआयडी पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांची नियुक्ती करण्यात आली. त्यावेळी पानसरे हे आजारी रजेवर गेलेले होते. दरम्यान, गुरूवारी (दि. २२) रात्री नागपूर येथून येऊन तांबे यांनी बुलढाणा पोलिस अधीक्षक पदाचा एकतर्फी प्रभार घेतला.
अवघ्या आठ महिन्यांच्या अवधीतच आपली साईड पोस्टवर बदली झाल्याने दुखावलेल्या विश्व पानसरे यांनी दुस-याच दिवशी २३ मे रोजी कॅटकडून आपल्या बदलीला स्थगिती मिळवली. दरम्यानच्या काळात नवे पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी बुलढाणा पोलिस अधीक्षक पदाचा कारभार सुरू करून काही प्रशासकीय बदल्यांही त्यांनी केल्या. गुरुवारच्या रात्री उशिरा २ वाजेपर्यंत कार्यालयात कामकाज केलेल्या पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांना सकाळी धक्काच बसला. कॅटकडून स्थगिती मिळवलेले पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी शुक्रवारी सकाळीच आपल्या खुर्चीचा ताबा घेतला.
त्यानंतर काही वेळातच कार्यालयात पोहचलेल्या निलेश तांबे यांच्यासमोर खुर्चीचा प्रश्न उद्भवला. एक खुर्ची आणि दोन पोलिस अधीक्षक या पेचप्रसंगामुळे पोलीस दलात खळबळ उडाली. अखेर अप्पर पोलिस अधीक्षकाच्या दालनात पोलीस अधीक्षक तांबे तुर्त बसले. पण पानसरे व तांबे या दोन्ही पोलिस अधीक्षकांनी आपला कारभार सुरू ठेवल्याने सर्वत्र चर्चांना उधाण आले आहे. आता विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे काय निर्देश देतात. याकडे पोलिस प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.