बुलडाणा : वैद्यकीय महाविद्यालयाच्या पार्कींगमध्ये उभ्या असलेल्या कारच्या काचा फोडून पाच लाख रुपयांची बैग पळवणा-या आंतरराज्यीय चोरट्याला बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कर्नाटकातील शिवमोगा शहरातून अटक केली आहे.चोरलेली पाच लाखांची रक्कमही पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून हस्तगत केली आहे.
साडेचार महिन्यांपूर्वी १६ सप्टेंबर २०२५ रोजी नितीन जिजेबा प-हाड रा.रिसोड जि.वाशिम यांनी मेहकर येथील स्टेट बँकेच्या शाखेतून पाच लाखांची रक्कम काढली होती व त्यांची मुलगी श्रृती प-हाड हिच्या वैद्यकीय शिक्षणाची फिस भरण्यासाठी बुलडाणा येथील राजर्षी शाहू बीएएमएस महाविद्यालयात आले होते.पार्कींगमध्ये कार लावून ते कार्यालयात गेले.दरम्यान,मेहकर शहरापासून या कारचा पाठलाग करत आलेल्या अज्ञात चोरट्याने कारची काच फोडून पाच लाखांची रक्कम असलेली बैग लंपास केली होती.मुलीच्या वैद्यकीय प्रवेशासाठी आणलेली रक्कम अशी चोरीस गेल्याने हादरलेल्या नितीन प-हाड यांनी बुलडाणा शहर पोलिसांत तक्रार नोंदवली होती.
जिल्हा पोलीस अधिक्षक निलेश तांबे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनिल अंबूलकर यांचे तपास पथक नियुक्त केले.या पथकाने मेहकर ते बुलडाणा पर्यंतच्या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासून संशयित चोरट्यांची ओळख पटवली.यातील आरोपी हे आंतरराज्यीय बैग लिफ्टींग व ग्लास ब्रेकींग गुन्हयातील सराईत असून ते त्यांच्या मूळ पत्त्यावर न राहता वेगवेगळ्या ठिकाणी वास्तव्य करत असल्याने पोलिसांपुढे मोठे आव्हान होते.तथापि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयित आरोपीचा माग काढला.
शिवमोगा (कर्नाटक) शहरात सलग पाच दिवस चोरट्यांचा शोध घेऊन मुख्य आरोपी सुनिल उर्फ बालू रामू बोवी (३२) याला पेस कालेज परिसर या उच्चभ्रू वस्तीतून स्थानिक पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेतले.त्याला या गुन्ह्याच्या कामात त्याचा भाऊ विष्णू रामू बोवी याने मदत केल्याचे समोर आले.यावेळी चोरीचे पाच लाख रूपयेही पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून हस्तगत केले.पोलिस रेकार्डवर हे सराईत गुन्हेगार असून विविध राज्यात त्यांच्यावर बैग लिफ्टींगचे गुन्हे दाखल आहेत.स्थानिक गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक अविनाश जायभाये,पोहेका दिपक लेकूरवाळे, गणेश पाटील ,चांद शेख, गजानन डोरले,राजू आडवे,पवन मामले,ऋषी खंडेराव यांच्या तपास पथकाने कर्नाटक राज्यात जाऊन ही कारवाई केली.