

Dapoli 70 Country Made Bombs Seized
जालगाव | पुढारी वृत्तसेवा : दापोली तालुक्यातील मूगीज परिसरात एका संशयित आरोपीकडून तब्बल ७० गावठी बॉम्ब रत्नागिरी गुन्हे अन्वेषण विभागाने हस्तगत केले. सुमारे २ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी संशयित आरोपीला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले असता त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
दापोली पोलीस ठाण्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रकाश जगताप (रा. कातकरवाडी, शिरखल) हा गावठी बॉम्बची वाहतूक करत असल्याची गोपनीय माहिती रत्नागिरी गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाली होती. त्या आधारे गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक बोरकर, विजय आंबेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी २८ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास सापळा रचला.
मंडणगड येथून आपल्या शिरखल गावाकडे जात असताना मूगीज गावानजीक प्रकाश जगताप याला वाहनासह ताब्यात घेण्यात आले. तपासणीदरम्यान त्याच्याकडे सुपारीएवढ्या गोल आकाराचे सुमारे ७० गावठी बॉम्ब आढळून आले. आरोपीसह मुद्देमाल दापोली पोलीस ठाण्यात आणून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, दापोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तोरस्कर यांनी घटनास्थळी भेट दिली. संशयित आरोपी प्रकाश जगताप याला अटक करून आज (दि. २९) न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक यादव करीत आहेत.