

लातूर : मोटारसायकलला कट मारल्याचा बहाणा करून वाद घालत लूटमार करणाऱ्या टोळीचा विवेकानंद चौक पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. शहरातील तीन पोलिस ठाण्यांमध्ये त्यांच्याविरुद्ध विविध गुन्हे दाखल असून या टोळीतील तिघांना अटक केली आहे. आरोपींमध्ये दोन अल्पवयीन आरोपींचा समावेश आहे. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून चार लाख 66 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
शहरातील नांदेड रोडवरील गरुड चौकात 24 जानेवारी रोजी एक इसम मोटारसायकलवरून जात असताना विनानंबर प्लेट असलेल्या स्प्लेंडर मोटारसायकलवरून आलेल्या तीन अज्ञात इसमांनी त्याच्या वाहनास मुद्दाम कट मारला. “तुमच्यामुळे आमचा मोबाईल फुटला आहे” असा बनाव करून त्यांनी फिर्यादीची मोटारसायकल आडवली. त्यानंतर त्याला धमकावून, दहशत निर्माण करून त्याच्या हातातील अंदाजे 5 ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी जबरदस्तीने काढून घेतली व ते तिघेही आरोपी घटनास्थळावरून पळून गेले.
या घटनेनंतर फिर्यादीने तत्काळ पोलिस स्टेशन विवेकानंद चौक येथे येऊन घडलेली घटना सांगितली. त्यावरून पोलिस स्टेशन विवेकानंद चौक येथे गुन्हा रजिस्टर नंबर 45/2026 अन्वये कलम 309(4), 3(5) भारतीय न्यायसंहिताप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलीसांनी फिर्यादीने दिलेले वर्णन तसेच गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे शहरात नाकाबंदी करण्यात आली. दरम्यान, संशयास्पदरीत्या फिरणारी विनानंबर प्लेट स्प्लेंडर मोटारसायकल पोलिसांच्या निदर्शनास आली. सदर मोटारसायकल अडवून तिच्यावर असलेल्या तीन इसमांना ताब्यात घेण्यात आले. त्यांना विश्वासात घेऊन चौकशी केली असता वसीम रज्जाक शेख (वय 26, रा. सिंदगाव, ता. रेणापूर, जि. लातूर), त्याच्यासोबतच्या दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांच्या मदतीने शहरातील विविध भागांत अशाच पद्धतीने जबरी चोरी व लुटमारीचे गुन्हे केल्याची कबुली दिली.
तपासादरम्यान असे निष्पन्न झाले की, सदर आरोपी व टोळीविरुद्ध लातूरच्या विवेकानंद चौक पोलीस ठाणे, एमआयडीसी, शिवाजीनगर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हे दाखल असून या सर्व गुन्ह्यांमध्ये आरोपींनी मोटारसायकलला कट मारणे, खोटा बहाणा करणे, नागरिकांना धमकावणे व त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने जबरदस्तीने हिसकावून घेणे अशीच पद्धत अवलंबिल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांच्याकडून वरील गुन्ह्यांतील एकूण 34 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने तसेच गुन्हा करण्यासाठी वापरलेली मोटारसायकल असा एकूण 4,66,550 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
मुख्य आरोपी वसीम रज्जाक शेख याच्यावर यापूर्वीही जबरी चोरी, लूटमार व तत्सम स्वरूपाचे गुन्हे दाखल असून तो सराईत गुन्हेगार असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येत असून पुढील तपास सुरू आहे.