Jalgaon Jamod Girl Dead Body AI Image
बुलढाणा

Buldhana Crime | ती ‘मृत’ समजलेली तरुणी पोलिस ठाण्यात हजर : बुलढाणा 'एलसीबी'च्या तपासाला नाट्यमय वळण

जळगाव जामोद तालुक्यातील राजूरा शिवारात शीर व धड वेगळ्या अवस्थेतील तरुणीचा मृतदेह आढळला

पुढारी वृत्तसेवा

Jalgaon Jamod Girl Dead Body

बुलढाणा : जळगाव जामोद तालुक्यातील राजूरा शिवारात शीर व धड वेगळ्या अवस्थेत आढळलेल्या तरुणीच्या मृतदेहाच्या प्रकरणाला नाट्यमय वळण मिळाले आहे. जिचा खून झाल्याचा संशय व्यक्त करत बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) तिच्या वडिलांसह भावाला अटक केली होती, तीच विवाहित तरुणी शिवानी भिलावेकर २७ मे रोजी मध्य प्रदेशातील खकनार पोलिस ठाण्यात प्रियकरासह जिवंत हजर झाली आहे. या घटनेमुळे बुलढाणा एलसीबीच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून पोलिस दलात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २६ एप्रिल रोजी जळगाव जामोद तालुक्यातील राजूरा शिवारातील एका शेताच्या बांधावर अज्ञात तरुणीचा शीर व धड वेगळा केलेला मृतदेह आढळून आला होता. मृतदेह जाळण्याचाही प्रयत्न करण्यात आल्याचे समोर आले होते. या घटनेनंतर बुलढाणा एलसीबीने शेजारील जिल्ह्यांतील बेपत्ता तरुणींची माहिती गोळा केली होती.

दरम्यान, मध्य प्रदेशातील खडकी येथील बापूराव नत्थू कळमेकर यांनी त्यांची नवविवाहित मुलगी शिवानी ही लग्नानंतर सहा दिवसांनी माहेरी आली आणि त्यानंतर बेपत्ता झाल्याची तक्रार खकनार पोलिस ठाण्यात दाखल केली होती. शिवानीचे नात्यातील एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते आणि ती सासरी जाण्यास इच्छुक नव्हती, अशी माहिती तपासादरम्यान पोलिसांना मिळाली होती.

या आधारावर राजूरा शिवारात सापडलेला मृतदेह हा शिवानीचाच असल्याचा निष्कर्ष काढत बुलढाणा एलसीबीने तिचे वडील बापूराव कळमेकर आणि भाऊ अजय कळमेकर यांना संशयावरून अटक केली होती. दोघांवर शिवानीचा खून करून मृतदेह दुचाकीवरून आणून टाकल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. सध्या हे दोघेही न्यायालयीन कोठडीत आहेत.

मात्र, कथित मृत शिवानी स्वतःच पोलिस ठाण्यात जिवंत हजर झाल्याने संपूर्ण प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. शिवानीने पोलिसांकडे “मी जिवंत आहे, माझ्या निर्दोष वडिलांना आणि भावाला सोडा,” अशी मागणी केल्याची माहिती समोर आली आहे.

विशेष म्हणजे, बुलढाणा एलसीबीने अवघ्या तीन दिवसांत गुन्ह्याचा छडा लावल्याचा दावा करत प्रसिद्धीपत्रकही जारी केले होते. मात्र, आता या तपासातील घाईगडबडीमुळे पोलिस यंत्रणा अडचणीत आली आहे.

दरम्यान, राजूरा शिवारात सापडलेला शीर व धड वेगळा असलेला मृतदेह नेमका कोणाचा होता, हा प्रश्न अद्याप अनुत्तरित असून या प्रकरणाचा तपास नव्याने करण्याची वेळ पोलिसांवर आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT