

बुलढाणा : सिंदखेडराजा तालुक्यातील पिंपळगांव उंडा शिवारात पंजाब राज्यातील 'हार्वेस्टर आपरेटर'चा झालेला मृत्यू हा नैसर्गिक नसून त्याचा खूनच केल्याचे गुढ पोलिसांच्या तपासात दि ३० एप्रिलच्या रात्री उलगडले. साखरखेर्डाचे ठाणेदार गजानन करेवाड यांनी सात तासात छडा लावत संशयित आरोपीच्या मुसक्या आवळल्या.
घटना अशी आहे की, गहू काढणीसाठी पंजाब राज्यातील हार्वेस्टर व्यावसायिक या परिसरात आलेले आहेत.त्यापैकी करमजीतसिंग उर्फ मंजीतसिंग जनकसिंग वय ५५ रा. सफीपुर जिल्हा संगरुळ (पंजाब राज्य) हा दि.२९ च्या रात्री पिंपळगांव उंडा शिवारात खाटेवर झोपलेला होता.दुस-या दिवशी दि.३० एप्रिलच्या सकाळी गावातीलशिवाजी काळे हे व्यायाम करण्याकरीता तेथे आले असता त्यांना करमजीतसिंग हा खाटेच्या खाली पालथा पडलेला व मृत अवस्थेत दिसला.याविषयी त्यांनी गावचे सरपंच उमेश काळे यांना कळवले.
त्यानंतर साखरखेर्डा पोलीस स्टेशनचे दुय्यम ठाणेदार संदीप मेधने, पो.कॉ.लक्ष्मण इनामे,नीलेश मोरे हे घटनास्थळी पोहचले.त्यावेळी मृताच्या डोक्याला मार लागल्याचे दिसून आल्याने मृत्यूबाबत पोलिसांना संशय आला. ठाणेदार गजानन करेवाड,उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे व फॉरेन्सिक टिमने घटनास्थळाची पाहणी केली.दरम्यान ठाणेदार करेवाड यांनी पंजाब राज्यातून आलेल्या सात जणांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता एक जण फरार असल्याचे समोर आले. पोलीसांनी तात्काळ फरार मदतनीस बबलीसींग करणसींग वय ३४ रा.अकलीया जि. मानसा (पंजाब) याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता ,आई बहिणीवर शिवीगाळ केल्यामुळे लोखंडी सळईने करमजीतसिंगला जीवे मारल्याचे सांगितले. साखरखेर्डा पोलीसांनी संशयित आरोपी बबलीसींग याच्यावर खूनाचा गुन्हा दाखल केला आहे.
अशी झाली गुन्ह्याची उकल..
ठाणेदार करेवाड यांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या सात जणातील अमितकुमार हा मृत करणजीतसिंग सोबत झोपायला असायचा. अन्य सहा जण आपापल्या हार्वेस्टर जवळ दूरवर मुक्कामी असायचे. अमितकुमार याने, आरोपी बबलीसींग व मृत करमसिंग या दोघांत वाद झाल्याचे सांगितले. त्यावरून आरोपी बबलीसींग याला पोलिसांनी ताब्यात घेतले असता त्याने खून केल्याची कबुली दिली.
डोक्यावर वार झाल्यावर मृतकाचा मालकाला फोन!
बबलीसींग याने लोखंडी टामीने करमसिंगच्या डोक्यावर मागील बाजूने जोरदार वार करून त्याला खाटेवर झोपवले व खुनाचा संशय येऊ नये म्हणून त्याच्या कानावर मोबाईल ठेवून तो पसार झाला. दरम्यान, मृतकाने मदतीसाठी आरडा ओरड केली ,मात्र आसपास कुणीच नसल्याने त्याने रात्री बारा वाजता पंजाब राज्यातील आपल्या मालकास दोनवेळा फोन केले मात्र ते उचलले गेले नसल्याने उपचाराअभावी तो गतप्राण झाला. डोक्याला पगडी बांधलेली असल्याने रक्तस्त्राव दिसला नाही. घटनास्थळाहून पसार झाल्यावर आरोपीने पंजाब राज्यातील आपल्या भावाला रात्री फोन केला असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.आरोपीला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.