बुलढाणा : विदेशातून वैद्यकीय पदवी मिळवल्यानंतर भारतात वैद्यकीय व्यवसायासाठी अनिवार्य असलेली 'एफएमजीई '(फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट एक्झामिनेशन) उत्तीर्ण न होता या परीक्षेच्या बनावट प्रमाणपत्राची महाराष्ट्र वैद्यक परिषदेच्या संकेतस्थळावर अवैध नोंदणी केली.
तसेच वैद्यकीय व्यवसाय सुरू करणाऱ्या बुलढाणा शहरातील दोन तरूण डॉक्टरांना महाराष्ट्र सायबर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. डॉ. संकेत उन्हाळे व डॉ. वरूण आखाडे ही त्यांची नावे आहेत.
दोन्हीही आरोपी डॉक्टरांना पुढील तपासासाठी महाराष्ट्र सायबर पोलीस मुंबईला घेऊन गेले. या कारवाईनंतर बुलढाण्याच्या शैक्षणिक व वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
काय आहे 'एफएमजीई' परीक्षा?
भारतातील अनेक उमेदवार रूप, चीन, जॉर्जिया, कजागिस्तान, किर्गिस्तान, फिलिपिन्स, नेपाळ व अन्य देशातून वैद्यकीय शिक्षण घेऊन एमबीबीएस वा तत्सम पदवी मिळवत असतात. भारतात परतल्यानंतर वैद्यकीय व्यवसायाचा परवाना प्राप्त करण्यासाठी त्यांना 'एफएमजीई' परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य असते. नॅशनल बोर्ड ऑफ मेडिकल सायन्सेस (NBEMS)द्वारे ही परीक्षा घेतली जाते. भारतातील काठिण्यपातळी असलेल्या परीक्षांपैकी 'एफएमजीई' ही एक परीक्षा समजली जाते. वैद्यकीय ज्ञानविषयक ३०० गुणांपैकी किमान १५० गुण मिळवणारा उमेदवारच उत्तीर्ण होतो. उत्तीर्ण उमेदवारांची संख्या अत्यल्प असते. त्यामुळे ही परीक्षा एक आव्हानच समजली जाते.
अलिकडेच ७ जुलै २०२६ रोजी यावर्षीच्या 'एफएमजीई' परीक्षेचा निकाल लागला. त्यात देशातील केवळ १२.४ टक्के उमेदवारच उत्तीर्ण होऊन भारतात वैद्यकीय व्यवसायाची नोंदणी करण्यासाठी पात्र ठरले आहेत.
'शॉर्टकट' ठरला सापळा
बुलढाणा जिल्ह्यातील डोणगावचा रहिवासी असलेला वरूण आखाडे व बुलढाणा शहरातील नामांकित शाळेत शिकलेला संकेत उन्हाळे या दोघांनी विदेशातून एमबीबीएस पदवी मिळवली. मात्र या दोघांनी महाराष्ट्र वैद्यक परिषदेच्या संकेतस्थळावर अनधिकृतपणे प्रवेश केला व ''एफएमजीई' परीक्षा उत्तीर्ण केल्याचे बनावट प्रमाणपत्र अपलोड करून वैद्यकीय व्यवसायासाठी नोंदणी केल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले.
उन्हाळे व आखाडे या दोघांनी बुलढाणा शहरात मेडिकल प्रॅक्टीसही सुरू केली होती. अखेर महाराष्ट्र सायबर पोलिसांनी या दोन्ही बोगस डॉक्टरांना बेड्या ठोकून त्यांच्या अवैध कारनाम्यांची पोलखोल केली.