Unopposed Directors Buldhana DCC Bank Election
बुलढाणा : प्रचंड आर्थिक अडचणींनंतर पूर्ववत झालेल्या बुलढाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या तब्बल १६ वर्षांनंतर होत असलेल्या निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम मुदतीनंतर ‘सहकार पॅनल’चे १२ संचालक बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे आता उर्वरित नऊ जागांसाठी २३ उमेदवारांमध्ये थेट लढत होणार आहे. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी तब्बल ११५ उमेदवारांनी १४९ उमेदवारी अर्ज मागे घेतले. यात अनेक दिग्गज नेत्यांनी ऐनवेळी निवडणुकीतून माघार घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
चिखलीच्या भाजप आमदार श्वेता महाले यांनी चार वेगवेगळ्या मतदारसंघांत दाखल केलेले उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यांच्यासह मलकापूरचे भाजप आमदार चैनसुख संचेती, काँग्रेसचे माजी आमदार धृपतराव सावळे, राजेश एकडे, माजी आमदार तथा जिल्हा भाजप अध्यक्ष विजयराज शिंदे, माजी आमदार तोताराम कायंदे, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रकाश पाटील आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष नरेंद्र खेडेकर यांच्यासह अनेक प्रमुख नेत्यांनी निवडणुकीतून माघार घेतली.
बिनविरोध निवडून आलेल्या संचालकांमध्ये केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, कामगारमंत्री आकाश फुंडकर, शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड, त्यांचे जावई मयूर बाहेकर, माजी आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रसेनजीत पाटील, शिवसेना (उबाठा) जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, पांडुरंग पाटील, राजेश देशमुख, दिनेश काळणे, कावेरी सोनसळे आणि आमदार श्वेता महाले यांचे वडील अंकुशराव पडघान यांचा समावेश आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या इच्छुकांना ‘सहकार पॅनल’मध्ये स्थान न मिळाल्याने सिंदखेडराजाचे आमदार मनोज कायंदे यांनी नाराजी व्यक्त करत ‘स्व. अजितदादा पवार शेतकरी परिवर्तन पॅनेल’ स्थापन केले आहे. या पॅनेलकडून सात उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत.
आमदार मनोज कायंदे यांनी जिल्हा बँकेला दिवंगत अजित पवार यांनी ३०० कोटी रुपयांचे ‘सॉफ्ट लोन’ मंजूर केल्यामुळे बँकेचे व्यवहार पुन्हा सुरू होण्यास मदत झाल्याचा दावा केला. मात्र, त्यांच्याच पक्षाला निवडणुकीत डावलण्यात आल्याबद्दल त्यांनी ‘सहकार पॅनल’वर नाराजी व्यक्त केली आहे.
उर्वरित नऊ जागांसाठी ‘सहकार पॅनल’कडून माजी आमदार संजय रायमुलकर, सुनील उदयकार, चंद्रशेखर संचेती, गोविंदराव मिरगे, अस्मिता हेलगे, पुष्पाताई बारवकर, गोविंद मापारी आणि श्रीकांत मारोडे हे आठ उमेदवार रिंगणात आहेत.
‘स्व. अजितदादा पवार शेतकरी परिवर्तन पॅनेल’कडून ज्ञानेश्वर पाटील, शिवचंद्र तायडे, मनोज दांडगे, उज्ज्वला मोरे, प्रतिभा टाले, मंदाकिनी पाटील आणि शिवनंदा खंड हे सात उमेदवार निवडणूक लढवत आहेत. याशिवाय अर्पिताताई विजयराज शिंदे, गजानन मामलकर, योगेश गायकवाड, संतोष रायपुरे, विश्वनाथ झाडोकार, ज्ञानदेव वाघोदे आणि वसंत घोंगडे हे सात उमेदवार स्वतंत्रपणे निवडणूक लढवत आहेत.
२३ ऑगस्ट रोजी मतदान होणार असून, २४ ऑगस्ट रोजी निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे उर्वरित नऊ जागांवरील लढतीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.