

बुलढाणा : अल्पवयीन विवाहितेची जिल्हा सामान्य रुग्णालयात प्रसूती होऊन तीने पुरूष जातीच्या बाळाला जन्म दिला. या घटनेमुळे फर्दापूर ता.मोताळा येथे एक वर्षापूर्वी झालेल्या बालविवाहाचे बिंग फुटले आहे. बालविवाह प्रतिबंधक यंत्रणांची निष्क्रियताही यामुळे समोर आली आहे.
या प्रकरणात मलकापूर येथील विशेष न्यायालयाने 'पोस्को' कायद्यानुसार आरोपी पवन भाऊराव ससाणे याला आज शुक्रवार दि.७ रोजी न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे.अल्पवयीन पिडितेच्या फिर्यादीवरून, धामणगाव बढे पोलिसांनी तीचा पती पवन भाऊराव ससाणे(२४), सासरे भाऊराव शामराव ससाणे, सासू रेखा भाऊराव ससाणे रा.फर्दापूर ता.मोताळा आणि पिडितेची आई सुगंधी मोग्या वाडिया रा.जामू जि.बैतुल (म.प्र.)आदीवर भारतीय न्याय संहिता,'पोस्को' व बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
अधिक माहिती अशी की, सामान्य रूग्णालयात १ ऑगस्ट २०२६ रोजी एका अल्पवयीन विवाहितेची प्रसूती झाल्याची माहिती सामान्य रुग्णालय प्रशासनाने पोलिसांना दिली. त्यानंतर धामणगाव बढे पोलिसांनी पीडितेची फिर्याद नोंदवून घेतली. ती अल्पवयीन असल्याचे माहित असूनही तीचा विवाह पवन भाऊराव ससाणे याच्यासोबत त्याच्या राहत्या घरी फर्दापूर येथे १२ मे २०२५ रोजी लावण्यात आला.
त्यावेळी तीचे वय अवघे १६वर्षे ९महिने होते तीची आई सुगंधी मोठ्या वाडिया रा.जामू जि.बैतूल (म.प्र.) तसेच पवन ससाणे याचे आई- वडिल हजर होते. विवाहानंतर गर्भवती राहिलेल्या पीडितेची जिल्हा रूग्णालयात प्रसूती झाली. तीचे वय अठरा वर्षाहून कमी असल्याने पती, सासू, सासरा व तीची आई अशा चौघांवर पोलिसांनी विविध कलमानुसार गुन्हे दाखल केले आहेत.
सामान्य रूग्णालयात या गर्भवतीच्या अनेकवेळा प्रसूतीपूर्व तपासण्या करण्यात आल्या त्यावेळी ती अल्पवयीन असल्याचे कसे दुर्लक्षित झाले? तसेच फर्दापूर येथील बालसंरक्षण अधिकारी तथा ग्रामसेवकाचे या बालविवाहाकडे कसे दुर्लक्ष झाले?आदी प्रश्न यानिमित्ताने समोर येत आहेत.धामणगाव बढे चे पोलिस निरीक्षक निखिल निर्मळ प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.