Buldhana Political Dispute
बुलढाणा : कथित बदनामीकारक वक्तव्यप्रकरणी भाजपाचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार विजयराज शिंदे यांनी शिवसेना (शिंदे गट) चे बुलढाणा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांना तब्बल १०० कोटी रुपयांच्या अब्रूनुकसानीची कायदेशीर नोटीस बजावली आहे. ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. असीम सरोदे यांच्यामार्फत पाठविण्यात आलेल्या या नोटिशीमुळे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
काही महिन्यांपूर्वी माध्यमांशी संवाद साधताना आमदार संजय गायकवाड यांनी विजयराज शिंदे यांच्या आश्रमशाळेबाबत गंभीर स्वरूपाचे आरोप केल्याचा दावा करण्यात आला आहे. हे आरोप निराधार असून त्यामुळे आपली सामाजिक आणि राजकीय प्रतिमा मलिन झाल्याचे विजयराज शिंदे यांचे म्हणणे आहे.
या प्रकरणी संबंधित आरोपांच्या आधारे आमदार गायकवाड यांच्याविरोधात पॉक्सो कायदा, विनयभंग, अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा तसेच बदनामीसंदर्भातील तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी करत विजयराज शिंदे यांनी यापूर्वी बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. मात्र, त्यावर कोणतीही कारवाई झालेली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
त्यानंतर अॅड. असीम सरोदे यांच्यामार्फत आमदार संजय गायकवाड यांना १०० कोटी रुपयांच्या अब्रूनुकसानीच्या भरपाईची नोटीस पाठविण्यात आली. तसेच बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षकांनाही स्वतंत्र नोटीस देत संबंधित प्रकरणाची चौकशी करून योग्य त्या कायदेशीर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, या नोटिशीमुळे विजयराज शिंदे आणि आमदार संजय गायकवाड यांच्यातील वैयक्तिक वादाला आता राजकीय स्वरूप प्राप्त होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) या दोन्ही पक्षांमध्येही या घडामोडींची चर्चा सुरू झाली असून पुढील घडामोडीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, या नोटिशीवर आमदार संजय गायकवाड यांची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप प्राप्त झालेली नाही.