देऊळगाव राजा : जालना येथून दुचाकीने आपल्या गावी परतत असलेल्या २७ वर्षीय युवकाचा अज्ञात भरधाव वाहनाच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना असोला फाट्यावर नुकतीच घडली आहे. अपघातानंतर संबंधित वाहनचालकाने जखमी युवकाला मदत न करता घटनास्थळावरून पलायन केल्याने संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणी देऊळगाव राजा पोलिस ठाण्यात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ऋषीकेश गजानन भागीले (२७, रा. टाकरखेड भागीले, ता. देऊळगाव राजा) हा शनिवारी (दि. २७) रात्री जालना येथून दुचाकीवरून (एमएच-२०-एपी-२५४५) आपल्या गावी परतत होता. रात्री सुमारे ९.४० वाजण्याच्या दरम्यान असोला फाटा येथील नागरे पेट्रोलपंपाजवळ अज्ञात वाहनाने भरधाव व निष्काळजीपणे येऊन त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
या भीषण धडकेत ऋषीकेश यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने उपचारासाठी हलविण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी रावसाहेब डोके यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.