

औसा : तुळजापूर-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील औसा तालुक्यातील बुधोडा परिसरात रविवारी पहाटे झालेल्या भीषण अपघातात तीन महिलांचा जागीच मृत्यू झाला, तर 11 जण जखमी झाले. भरधाव वेगाने येणाऱ्या क्रेटा कारने पुढे जात असलेल्या क्रूझर जीपला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, उमरगा येथील भाविक देवदर्शनासाठी बीड जिल्ह्यातील पुरुषोत्तमपुरी येथे क्रूझर जीपने निघाले होते. रविवारी पहाटे सुमारे 1.30 वाजण्याच्या सुमारास ते औसा येथून लातूरकडे जात असताना बुधोडा गावाजवळील हॉटेल द्वारकाच्या पुढे आले. त्यावेळी मागून भरधाव वेगाने येणाऱ्या एमएच-24-एडब्ल्यू-3691 क्रमांकाच्या क्रेटा कारच्या चालकाने निष्काळजीपणे वाहन चालवत पुढील एमएच-12-सीआर-8077 क्रमांकाच्या क्रूझर जीपला पाठीमागून जोरदार धडक दिली.
धडक इतकी भीषण होती की क्रूझर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. जीप प्रथम रस्त्यालगतच्या विजेच्या खांबाला धडकली आणि त्यानंतर पलटी होत रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात जाऊन पडली. अपघातानंतर वाहनांतील प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. या अपघातात निलावती आनंदराव पाटील, सरोजा सुरेश पतंगे आणि रेश्मा गंगाधर पाटील (सर्व रा. नवी पेठ, उमरगा, जि. धाराशिव) यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघातात लक्ष्मण शिवानंद मसरे, दीपाली कन्हैया स्वामी, शितल प्रवीण देशमुख, सुचिता सचिन देशमुख, कल्पना नितीन देशमुख, कन्हैया नागय्या स्वामी, गंगाधर आनंदराव काटे, वीरेश गंगाधर पाटील, विघ्नेश्वर गंगाधर पाटील, मानसी लक्ष्मण कोलंगे आणि भक्ती देशमुख हे जखमी झाले आहेत. सर्व जखमींना तातडीने लातूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, पोलिस आणि आपत्कालीन यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. पोलिसांनी पंचनामा करून अपघाताची नोंद केली आहे. जखमी लक्ष्मण शिवानंद मसरे यांच्या फिर्यादीवरून क्रेटा कारचा चालक आदित्य श्रीहरी भताने (रा. लातूर) याच्याविरुद्ध औसा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
अपघाताची तीव्रता इतकी मोठी होती की क्रूझर जीपचा अक्षरशः चक्काचूर झाला. वाहनातील प्रवाशांच्या चपला, कपडे, पिशव्या तसेच पूजेचे साहित्य घटनास्थळी विखुरलेले दिसत होते.
या भीषण अपघाताची वार्ता बुधोडा परिसरात पसरताच अपघातस्थळी दिवसभर नागरिकांची गर्दी झाली होती. देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर काळाने घाला घातल्याने घटनास्थळी उपस्थित प्रत्येकजण हळहळ व्यक्त करत होता. या दुर्घटनेमुळे मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.