

मानवत : मानवत तालुक्यातील केकर जवळा शिवारात भरधाव कंटेनरच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या २० वर्षीय युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी कंटेनर चालकाविरुद्ध मानवत पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केकर जवळा येथील सय्यद महेर सय्यद मेहबूब (वय २०) हा युवक ८ जून रोजी रात्री साडेआठच्या सुमारास शौचालयासाठी घराबाहेर गेला होता. त्यावेळी केकर जवळा-पाथरी मार्गावरील रस्त्यावर भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनरने त्याला जोरदार धडक दिली. या अपघातात युवकाच्या कंबरेला व गळ्याला गंभीर दुखापत झाली.
घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी व ग्रामस्थांनी जखमी युवकाला तातडीने पाथरी येथे प्राथमिक उपचारासाठी नेले. त्यानंतर अधिक उपचारासाठी परभणी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना रात्री सुमारे ११.३० ते १२ वाजण्याच्या दरम्यान त्याचा मृत्यू झाला.
तपासादरम्यान अपघातास कारणीभूत ठरलेले वाहन DD-01-P-9606 क्रमांकाचे कंटेनर असल्याचे समोर आले. संबंधित वाहनाचा चालक प्रकाश गणपत राठोड (वय ५०, रा. हिरानगर, हातराळ, ता. मुखेड, जि. नांदेड) असल्याचे निष्पन्न झाले आहे. अपघातानंतर वाहनासह चालकाला काही अंतरावर ताब्यात घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
याप्रकरणी मृत युवकाचे नातेवाईक सय्यद खुयूम सय्यद हमीद यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मानवत पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०६(१), १२५(अ), १२५(ब) व २८१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास प्रभारी पोलीस निरीक्षक दर्शन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
भरधाव व निष्काळजी वाहनचालक ठरला कारणीभूत
फिर्यादीनुसार, कंटेनर चालकाने वाहन भरधाव व निष्काळजीपणे चालवत समोरून येत युवकाला धडक दिली. अपघातात गंभीर दुखापत झाल्याने युवकाचा मृत्यू झाला. त्यामुळे चालकाविरुद्ध सदोष मनुष्यवधासह विविध कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
गावावर शोककळा
अवघ्या २० वर्षांच्या युवकाच्या दुर्दैवी मृत्यूमुळे केकर जवळा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. घटनेनंतर नातेवाईकांसह ग्रामस्थांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली होती. युवकाच्या अकाली निधनाने परिसरात शोककळा पसरली आहे.