Adgaonraja Gadkot Fort 'on the brink of destruction'
देऊळगाव राजा, पुढारी वृत्तसेवा : आज बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यातील अडगावराजा गडकोट किल्ला मराठा वैभव आणि स्थापत्यकलेचा साक्षीदार उद्ध्वस्ततेच्या दारी उभा आहे. तटबंदी भन्न, मंदिरे ढासळलेली, भुयारी मार्ग कोसळलेले, आणि पुरातन विहिरी अंधारात गडप झालेल्या ! इतका समृद्ध वारसा असतानाही शासन आणि प्रशासनाचे दुर्लक्ष कायम आहे. श्रीमंत राजे लखुजीराव जाधवराव यांच्या काळात बांधलेल्या या गडकोटावर आज झीज आणि दुर्लक्षाचे व्रण स्पष्ट दिसतात.
"गडकोटवर इतिहास झोपला आहे, पण शासन अजून जागे झालेले नाही!" स्थानिकांनी स्थापन केलेली 'श्रीमंत राजे लखुजीराव जाधवराव गड-किल्ले ऐतिहासिक संवर्धन प्रतिष्ठान' संस्था गेल्या काही वर्षांपासून सातत्याने प्रशासन दरबारी मागणी करत आहे. जिल्हाधिकारी, पुरातत्त्व व पर्यटन विभागाकडे तांत्रिक अहवाल आणि अंदाजपत्रक सादर करण्यात आले असले, तरी शासनाचे उत्तर कागदांपुरतेच राहिले आहे.
'अधिसूचना करा, संरक्षण द्या!' अशी ग्रामस्थांची मागणी किल्ल्याची तांत्रिक तपासणी व संवर्धन अहवाल तयार करावा. पुरातत्व आणि पर्यटन विभागाकडून निधी मिळवावा. किल्ल्याला 'संरक्षित पुरा-तत्व क्षेत्र' म्हणून अधिसूचित करावे. पर्यटन आराखड्यात समावेश करून स्थानिक युवकांना रोजगार द्यावा.
सध्या किल्ल्याच्या परिसरात झाडी, कचरा आणि भग्न तटबंदी पाहून इतिहासप्रेमी व्यथित आहेत. "या गडावर तोफांचे आवाज नाहीत, पण इतिहासाचा आक्रोश अजून ऐकू येतो," असे ग्रामस्थ म्हणतात.
तज्ज्ञांच्या मते, शासनाने प्रकाशयोजना, मार्गदर्शन केंद्र व सुरक्षाव्यवस्था उभारल्यास अडगावर-ाजा गडकोट हा बुलढाण्याचा प्रमुख पर्यटन वारसा ठरू शकतो.