बुलढाणा : संदीप वानखेडे
शहरातील एका उच्चभ्रू वस्तीत ७० वर्षांच्या एका वृद्ध व्यापाऱ्याने १२ वर्षांच्या अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे करून तिचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी बुलढाणा शहर पोलिसांनी आरोपीविरुद्ध 'पोक्सो' कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून त्याला बेड्या ठोकल्या आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शंकर मंगतानी असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो शहरातील एक प्रस्थापित व्यापारी आहे. पीडित मुलगी आणि आरोपीचे कुटुंब हे दोन्ही व्यावसायिक क्षेत्रातील असून त्यांचे गेल्या अनेक वर्षांपासून घनिष्ठ कौटुंबिक संबंध आहेत. एकमेकांच्या घरी येणे-जाणे असल्याने पीडित मुलगी आरोपीच्या घरी नेहमीप्रमाणे खेळण्यासाठी गेली होती.
पीडित मुलगी आरोपीच्या घरी असलेल्या पाळीव कुत्र्यासोबत खेळण्यासाठी गेली होती. घरात कोणीही नसल्याची संधी साधून, ७० वर्षीय नराधमाने या विश्वासाचा गैरफायदा घेतला. त्याने मुलीशी अश्लील वर्तन करत तिचा विनयभंग केला. या प्रकारानंतर घाबरलेल्या पीडित मुलीने हा संपूर्ण प्रकार आपल्या पालकांना सांगितला.
मुलीच्या पालकांनी तातडीने बुलढाणा शहर पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. तक्रारीवरून बुलढाणा शहर पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (POCSO) आणि विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करून आरोपीला तात्काळ अटक केली आहे.