पुणे : मजुरीसाठी आलेल्या एका कुटुंबातील चारवर्षीय चिमुरडीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला आहे. माणुसकीला काळिमा फासणारी ही घटना मंगळवारी (दि. 17) पहाटे पुणे रेल्वे स्थानकावर घडली. रेल्वे सुरक्षा बल आणि लोहमार्ग पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अवघ्या काही तासांत नराधम आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. मात्र स्टेशनवर घडलेल्या या घटनेमुळे रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
रेल्वे प्रशासन, आरपीएफ आणि लोहमार्ग पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, पीडित मुलीचे कुटुंब मूळचे मध्य प्रदेशातील खांडवा जिल्ह्यातील रहिवासी असून ते मजुरीसाठी महाराष्ट्र - मध्य प्रदेश सीमाभागात आले होते. 17 फेब्रुवारी रोजी हे कुटुंब पुणे रेल्वे स्थानकावरून खांडवा येथे जाण्यासाठी आले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी गाडी असल्याने ते कुटुंब फलाट क्रमांक 3 वर झोपले होते. आरोपी त्यांच्याच शेजारी बसून प्रवास करीत होता व गाडीत साहित्य उतरवताना मदतही करीत होता. दरम्यान, मध्यरात्री दीड वाजता पीडितेचे वडील नैसर्गिक विधीसाठी उठले तेव्हा मुलगी जागेवर दिसली नाही. कुटुंबाने सर्वत्र शोध घेऊनही मुलगी न सापडल्याने त्यांनी रात्री 3 वाजता लोहमार्ग पोलिसांशी संपर्क साधला. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले. यामध्ये लाल रंगाचा टी शर्ट घातलेला एकजण चिमुरडीचा हात धरून तिला स्थानकाबाहेर नेताना दिसला. पीडितेच्या आईने फुटेजमधील त्या व्यक्तीला ओळखले. जीआरपीच्या पथकांनी तातडीने शोध मोहीम राबवून संशयिताचा मागोवा घेतला. काही तासांत पहाटे साडेपाचच्या सुमारास आरोपी त्या मुलीला पुन्हा प्लॅटफॉर्म क्रमांक 3 जवळ सोडून पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी पार्सल गेटजवळ त्याला पकडले. याप्रकरणी लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.