चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : नागभीड तालुक्यातील घोडाझरी तलावात बुडालेल्या मनीष श्रीरामे (वय २६), धीरज झाडें (वय २७), संकेत मोडक (वय २५), चेतन मांदाडे (वय १७ ) या तरूणांचे मृतदेह सोमवारी (दि.१७) सापडले. रविवारी वरोरा तालुक्यातील शेगाव येथील तरूण दुपारच्या सुमारास तलावात बुडून बेपत्ता होते. आठ तरूण वाहनाने पर्यटनाचा आनंद लुटण्याकरीता या ठिकाणी आले होते.
वरोरा तालुक्यातील शेगाव येथील ८ तरूण एका वाहनाने घोडाझरी तलावावर दुपारच्या सुमारास आले होते. यावेळी सेल्फी काढताना व पोहताना एक तरूण सांडव्याजवळ तलावात पडून बुडाला. त्यामुळे त्याला तिघा मित्रांनी वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, मित्राला वाचविण्याचा प्रयत्नात तिघेही बुडाले. त्यानंतर बराचवेळ पर्यंत चौघेही मित्र तलावाबाहेर न आल्याने बुडून बेपत्ता झाले. इतर मित्रांनी त्यांचा शोध घेतला. परंतु त्यांचा पत्ता लागला नाही. मित्रांनी नागभीड पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन शोधमोहीम राबविली. अखेर सायंकाळ झाल्याने शोध मोहीम थांबविण्यात आली.
आज सकाळपासून पुन्हा घोडाझरी घटनास्थळी परिसरात शोध मोहीम सुरू करण्यात आली. सकाळच्या सुमारास एका तरुणाचा तर दुपारी तिघांचे असे चौघांचे मृतदेह नागभीड पोलिसांच्या हाती लागले. तरूणाचे मृतदेह शवविच्छेदनासाठी नेण्यात आले. वरोरा तालुक्यातील शेगाव येथे शेाककळा पसरली असून तरुणांच्या दुर्देवी निधनावर हळहळ व्यक्त होत आहे.
हेही वाचा