Tractor Accident: Driver Crushed to Death Under Sand-Laden Tractor
भंडारा : पुढारी वृत्तसेवा
नदी घाटातून वाळूने भरलेला ट्रॅक्टर बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असताना, खाली पडून चाकासमोर आल्यामुळे आणि त्यानंतर चिरडल्यामुळे एका ट्रॅक्टर चालकाचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला. ही घटना रविवारी सकाळी ११ वाजता, लाखंदूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इटान वाळू घाटावर घडली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू केला आहे.
मृत व्यक्तीची ओळख सचिन विनोद सौंदारकर (वय ३०, रा. इटान) अशी पटली आहे. सचिन आपल्या ट्रॅक्टरमध्ये वाळू भरण्यासाठी इटान वाळू घाटावर गेला होता. वाळू भरल्यानंतर तो ट्रॅक्टर घाटाबाहेर काढत असताना, अचानक तो वाहनावरून खाली फेकला गेला आणि जमिनीवर पडला.
त्यानंतर ट्रॅक्टरचे मागील चाक त्याच्या अंगावरून गेले. गंभीर अवस्थेत त्याला भंडारा येथील जिल्हा रुग्णालयात नेले जात होते; मात्र, वाटेतच उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे. मृत सचिन हा अविवाहित होता. त्याच्या पश्चात त्याचे आई-वडील असा परिवार आहे.