Hingoli accident | हट्ट्यात ट्रॅक्टर उलटून तरुणाचा चिरडून मृत्यू; संतप्त ग्रामस्थांचा हट्टा पोलीस स्टेशनवर रोष

अवैध वाळू वाहतुकीच्या प्रश्नावरून नागरिकांनी पोलिसांविरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला आहे
Hingoli accident
Hingoli accident
Published on
Updated on

हट्टा : परभणी-हिंगोली रस्त्यावर ट्रॅक्टर उलटून झालेल्या भीषण अपघातात संकेत पिराजी खिल्लारे (वय २२) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना २८ मार्च रोजी रात्री १२ वाजेच्या सुमारास हट्टा बस स्थानकाजवळ घडली. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, अवैध वाळू वाहतुकीच्या प्रश्नावरून नागरिकांनी पोलिसांविरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संकेत खिल्लारे हा शनिवारी रात्री आपला ट्रॅक्टर घेऊन हट्टा बस स्थानकाकडून नवीन प्लॉटिंग भागाकडे जात होता. परभणी-हिंगोली मुख्य रस्त्यावरून खाली उतरत असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर अचानक पलटी झाला. यावेळी ट्रॅक्टरचे जड टायर संकेतच्या डोक्यावरून गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

अवैध वाळू वाहतूक अन् होणारे दुर्लक्ष यामुळेच अपघात

हा अपघात इतका भीषण होता की, ट्रॅक्टरच्या धडकेमुळे रस्त्या कडेचा विद्युत पोलही जमीनदोस्त झाला. यामुळे आडगाव फीडरचा वीजपुरवठा पूर्णपणे खंडित झाला असून, दुसऱ्या दिवशीही अनेक भागांत अंधार कायम होता. घटनेची माहिती मिळताच एपीआय (API) संग्राम जाधव आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. मात्र, यावेळी उपस्थित तरुणांनी आणि ग्रामस्थांनी पोलिसांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. हट्टा परिसरात मोठ्या प्रमाणात सुरू असलेली अवैध वाळू वाहतूक आणि त्याकडे होणारे दुर्लक्ष यामुळेच असे अपघात घडत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. विशेष म्हणजे, अपघातग्रस्त ट्रॅक्टरला नंबर प्लेटही नसल्याचे समोर आले आहे.

रविवारी सकाळी संकेतचे पार्थिव हट्टा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी आणण्यात आले. यावेळी हॉस्पिटल परिसरात नातेवाईक आणि ग्रामस्थांची मोठी गर्दी जमली होती. अपघाताची अद्याप अधिकृत नोंद झाली नसली, तरी पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news