भंडारा : मत चोरी प्रकरणाला घेऊन संपूर्ण देशात सर्वसामान्य नागरिकांसह मतदारांमध्ये निवडणूक आयोगाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला नुकताच फटकारले आहे. मात्र मागील काही वर्षापासून विविध निवडणुकींच्या निकालात मत चोरीला घेऊन निवडणूक आयोगाची भूमिका संशयास्पद असल्याचे प्रकरण उघडकीस आल्याने देशाची लोकशाही व संविधान धोक्यात असल्याचा आरोप आमदार नाना पटोले यांनी केला आहे. ते १६ ऑगस्ट रोजी तालुक्यातील चारभट्टी पुयार येथील जागृत हनुमान मंदिर परिसरात आयोजित श्रावण मास समाप्ती कार्यक्रमाच्या अनुषंगाने आयोजित सभेत बोलत होते.
ते म्हणाले की, देशातील प्रत्येक निवडणूक पारदर्शी होणे आवश्यक आहे. त्यामुळे देशातील लोकशाही व संविधान कायम राहू शकतो. मात्र मागील काही वर्षांत झालेल्या विविध निवडणुकीचे निकाल पाहून निवडणूक आयोगाच्या पारदर्शीतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. दरम्यान, काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात व पुढाकारात मत चोरी प्रकरण उघडकीस आल्याने निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे.
तथापि, मताच्या संविधानिक अधिकारावर शासनाकडून हल्ला झाल्याने देशाची लोकशाही व संविधान यांना धोका असल्याचा आरोप केला आहे. तर राज्य व देशाची सरकार शेतकऱ्यांसोबत जीवघेणा खेळ खेळत असल्याचाही आरोप आमदार पटोले यांनी केला आहे. दरम्यान ओबीसी जातीसह सर्व जातीनिहाय जनगणनेला घेऊन आग्रही काँग्रेसच्या भूमिकेला देशातील विद्यमान सरकारला समर्थन करावे लागले असल्याचा दावा पटोले यांनी केला.
मागील २७ वर्षांपासून आमदार नाना पटोले व मित्र परिवाराच्या पुढाकारात तालुक्यातील चारभट्टी पुयार येथे दरवर्षी श्रावणमास समाप्तीचे कार्यक्रम आयोजित केले जाते. यावर्षी आयोजित या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आमदार नाना पटोले उपस्थित होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ प्रशांत पडोळे, चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ नामदेव किरसान, भंडारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रमेश डोंगरे, भंडारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक व लाखांदूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रदीप बुराडे, खरेदी विक्री संस्थेचे सभापती रमेश पारधी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुरेश ब्राह्मणकर, भंडारा जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती शितल राऊत, माजी सभापती मदन रामटेके, तहसीलदार वैभव पवार, चंद्रशेखर टेंभुर्णेसह अन्य मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे संचलन खरेदी विक्री संस्थेचे संचालक रामचंद्र राऊत यांनी केले तर आभार पंचायत समिती सदस्य मंगेश राऊत यांनी मानले. या कार्यक्रमात तालुक्यातील हजारो महिला, पुरुष, भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्रावण मास समाप्तीचे औचित्य साधून दरवर्षी तालुक्यातील चारभट्टी पुयार येथे जागृत हनुमान मंदिर परिसरात हनुमान चालीसाचे पठण केले जाते. यावर्षी या कार्यक्रमांतर्गत मनीष सोनी सह इटलीच्या माही गुरुजी यांचे नेतृत्वात व मार्गदर्शनात स्वादी सिल्विया, स्वादी जालिया व स्वादि लाऊरा द्वारा हनुमान चालीसाचे पठण करण्यात आले. तथापि, इटलीतील विदेशी मुलींद्वारा भारत देशाच्या संस्कृतीतील हनुमान चालीसाचे हिंदीत पठण ऐकून हजारो भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत होते.