भंडारा: पांदण रस्त्याच्या पाण्याच्या पाईपमध्ये अडकलेल्या बिबट्याची लाखनी वन विभागाने सुटका करुन जेरबंद केले. ही घटना लाखनी वनपरिक्षेत्रातील डोंगरगाव साक्षर येथे घडली. डोंगरगाव ते रामपुरी पांदण रस्त्याच्या पाण्याच्या पाईपमध्ये बिबट अडकल्याची माहिती गावकऱ्यांकडून वनरक्षक बोरकर यांना मिळाली. या माहितीवरुन लाखनीचे वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी कर्मचार्यांसह घटनास्थळी धाव घेतली.
बिबटची सुटका करण्यासाठी वन्यप्राणी बचाव दलाला पाचारण करण्यात आले. त्यांनी पाईपच्या एका बाजुला पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद केले. त्यानंतर सदर बिबट हा शारीरिकदृष्ट्या सुदृढ असल्याचा अहवाल पशुधन विकास अधिकारी पवन पावळे यांनी दिल्यानंतर बिबट्याला निसर्ग अधिवासात मुक्त करण्यात आले. ही कारवाई साकालीचे सहाय्यक वनसंरक्षक संजय मेंढे, सचिन निलख, वनपरिक्षेत्र अधिकारी नितेश धनविजय, शुभम मोदनकर, अनिल शेळके, बघेले, ढोले, मेश्राम, कुटारे,वनपाल जंकास आदींनी केली.