

नारायणगाव : जुन्नर तालुक्यातील बल्लाळवाडी येथे स्थानिक शेतकऱ्यांच्या तक्रारीनुसार वन खात्याने लावलेल्या पिंजऱ्यात सोमवारी (दि. ३१) पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास बिबट्या जेरबंद झाल्याची माहिती वनक्षेत्रपाल प्रदीप चव्हाण यांनी दिली. या बिबट मादीचे वय अंदाजे साडेतीन वर्षे असून तिला माणिकडोह येथील निवारा केंद्रात हलवण्यात आले आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, बल्लाळवाडी येथे मागील आठवड्यात दत्तात्रय डोंगरे यांच्या शेतामध्ये कांदा काढणी सुरु असताना सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास मजुरांना तीन बिबटे दिसले होते. त्यामुळे मजुरांची एकच तारांबळ उडाली होती. संबंधित शेतकऱ्यांनी तातडीने वनविभागाला माहिती दिल्यानंतर घटनेचे गांभीर्य ओळखून वन विभागाने बिबट्याला पकडण्यासाठी घटनास्थळी तीन पिंजरे लावले. तसेच ड्रोन कॅमेराच्या माध्यमातून उसाच्या क्षेत्रात बिबट्या आहे किंवा कसे याबाबत सुद्धा शोध सुरू केला होता.
दरम्यान, वन खात्याने या ठिकाणी एक बिबट्या पकडला असला तरी अद्यापही या परिसरात तीन बिबटे असून त्यांना देखील वन पकडावे, अशी मागणी सुधीर घोलप यांनी केली आहे. बल्लाळवाडी परिसरामध्ये बिबट्याचे हॉटस्पॉट झाले असून वन खात्याने या परिसरामध्ये सतर्क रहावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
बल्लाळवाडी येथे एक बिबट्या पकडला असला तरी तेथे तीन बिबट्या असल्याची स्थानिक नागरिकांची तक्रार आहे. त्यामुळे तेथे दोन पिंजरे लावण्यात आले आहेत. सध्या बिबट्यांचा प्रजनन काळ असल्यामुळे दिवसादेखील बिबटे लोकांना दिसत आहे. बिबट्या कुठे दिसल्यास तात्काळ वन खात्याशी संपर्क साधावा.
-प्रदीप चव्हाण, वनक्षेत्रपाल.