भंडारा : राज्यात गाजत असलेल्या शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणात भंडारा जिल्हा परिषदेचे माजी प्रभारी शिक्षणाधिकारी (माध्यमिक) रवींद्र पंजाबराव सलामे यांना गुरूवारी (दि.३) अटक करण्यात आली. त्यांना ६ जुलैपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. या घोटाळ्यातील आणखी काही आरोपी भंडारा जिल्ह्यात असून पोलिसांकडून जिल्हाभर अटकसत्र सुरू आहे.
शिक्षक भरती घोटाळा संबंधाने नागपूर शहरातील पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद भंडारा कार्यालयातील आरोपी रवींद्र सलामे यांचा सहभाग असल्याने त्यांना गुरूवारी ताब्यात घेण्यात आले. रविंद्र सलामे यांनी पराग नानाजी पुडके (रा.लाखनी) हा कधीही कोणत्याही शाळेमध्ये सहाय्यक शिक्षक पदावर नियुक्तीला नसताना त्याचे नानाजी पुडके विद्यालय जेवनाळा (ता. लाखनी) या शाळेत मुख्याध्यापक पदाच्या नियुक्तीसाठी त्याने बनावट शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद नागपूर यांचे नियुक्ती मान्यता आदेश, सेवा सातत्य, एसकेबी शाळा यादव नगर नागपूर या शाळेचे लेटरहेडवर बनावट अनुभव प्रमाणपत्र आरोपी महेंद्र म्हैसकर याचेसोबत तयार करून शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद यांच्या कार्यालयात प्रस्ताव सादर केले होते. यावरुन शिक्षणाधिकारी सलामे यांचा सहभाग दिसून आल्याने त्यांना अटक करण्यात आली.
शिक्षक भरती घोटाळा उघडकीस आल्यानंतर चौकशी सुरू झाली. ही चौकशी पवनी तालुक्यातून सुरू करण्यात आली. यामध्ये पवनी तालुक्यातील एका शाळेच्या तीन शिक्षकांना अटक करण्यात आली. आता ही चौकशी साकोली तालुक्यात सुरू असून अटक होण्याच्या भीतीने काही शिक्षक अटकपूर्व जामीनासाठी न्यायालयाच्या चकरा मारत आहेत तर काही शिक्षक फरार होण्याच्या तयारीत आहेत. बऱ्याच शिक्षकांनी बँकेकडून कर्ज घेऊन घर, बंगले, कार घेतल्या आहेत. जर आपल्यावर गुन्हे दाखल झाले तर नोकरीपासून हात धुवावे लागेलच तसेच बँकांच्या कर्जाची परतफेड कशी करावी, अशीही चिंता या शिक्षकांना सतावू लागली आहे.