भंडारा

भंडारा : जागेच्या वादातून खून, आरोपीला सात वर्षांचा कारावास

दिनेश चोरगे

भंडारा; पुढारी वृत्तसेवा : जागेच्या वादातून काठीने मारहाण करुन एकाचा खून करणाऱ्या आरोपीला न्यायालयाने सात वर्षांचा सश्रम कारावास आणि ५० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. ही घटना भंडारा तालुक्यातील दवडीपार बेला येथे २६ नोव्हेंबर २०२१ च्या रात्री घडली होती.

या घटनेतील फिर्यादी महेश ईस्तारी बांते याच्या जुन्या घराच्या जागेवरुन आरोपी दुर्गेश्वर मदन मते याच्या कुटुंबियांसोबत वाद होता. याच कारणावरुन घटनेच्या दिवशी आरोपी दुर्गेश्वर मते, मदन मते, मारोती मते,  मदन मते यांची पत्नी, संजय मदन मते, निलम मदन मते यांनी भांडण करुन शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. लाथाबुक्क्यांनी आणि काठीने मारहाण करीत असताना फिर्यादी महेश बांते याचा भाऊ दिनेश बांते हा आपल्या पत्नीसह भांडण सोडविण्यासाठी आला. दरम्यान, दुर्गेश्वर याने दिनेश बांते याच्या डोक्यावर लाकडी काठीने हल्ला करुन त्याचा खून केला.

या घटनेची तक्रार महेश बांते याने भंडारा पोलिस ठाण्यात केली. यावरुन पोलिसांनी आरोपींविरुद्ध भांदविच्या कलम ३०२, ३०७, ३२३, ५०४, १४३, १४७, १४८, १४९ अन्वये गुन्हा नोंदविला. तत्कालिन पोलिस निरीक्षक सुभाष बारसे आणि सहाय्यक पोलिस निरीक्षक योगेश पारधी यांनी घटनास्थळ गाठून तपासाला सुरुवात केली. प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांना विचारपूस केल्यानंतर आरोपींना अटक करुन न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. हा खटला अतिरिक्त व जिल्हा सत्र न्यायाधीश पी.एस. खुने यांच्या न्यायालयात चालला. साक्षपुराव्यांच्या आधारे दिनेश बांते यांची हत्या केल्याप्रकरणी मुख्य आरोपी दुर्गेश्वर मते यास सात वर्षांचा कारावास आणि ५० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. तर मदन मते, मदन मते यांची पत्नी, मारुती मते, संजय मते, निलम मते यांना कलम ३२३ मध्ये दोन वर्षे बंधपत्र व २ वर्षांकरीता १५ हजार प्रत्येकी अनामत देय रक्कम दोष सिद्ध झाल्याने चांगल्या वागणुकीबद्दल न्यायालयाने दोन वर्षांच्या बॉन्डवर मुक्त केले. न्यायालयात सरकारी पक्षाकडून अ‍ॅड. व्हि.बी. भोले यांनी काम पाहिले तर पैरवी अधिकारी म्हणून पोलिस नायक भगवान बांडेबुचे यांनी कामकाज पाहिले.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT