भंडारा : लाखांदूर तालुक्यातील विरली (बु) गावातील शेतशिवारात पैशांच्या वादातून एकाची नहरात बुडवून हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना बुधवारी (दि.२९) दुपारी ३ च्या सुमारास घडली. या घटनेत विरली (बु) येथील नरेश दुनेदार (वय ४५, रा. विरली बु.) याचा मृत्यू झाला. याप्रकरणी लाखांदूर पोलिसांनी नारायण मेश्राम (वय ४२, रा. विरली बु.) याला अटक केली आहे.
पोलिस सूत्रानुसार, मृत व आरोपी हे दोघेही दुपारच्या सुमारास दारूच्या नशेत स्थानिक नहर परिसरात मासे पकडण्यासाठी गेले होते. त्याचदरम्यान आरोपी नारायण मेश्राम याने नरेश दुनेदारवर पैशांची चोरी केल्याचा आरोप केला. या आरोपावरून दोघांमध्ये जोरदार वाद आणि मारहाण झाली. या भांडणात संतापलेल्या नारायण मेश्रामने नरेशला नहरात ओढत नेऊन पाण्यात बुडवून ठार केल्याचे उघड झाले आहे.
घटनास्थळावर उपस्थित काही नागरिकांनी हा प्रकार पाहताच लाखांदूर पोलिसांना माहिती दिली. या घटनेची माहिती होताच पवनीचे उपविभागीय पोलीस अधिकारी मनोज सिडाम, लाखांदूरचे ठाणेदार सचिन पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष गंद्रे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दिगांबर तलमले, पोलीस हवालदार सतीश सिंगनजुडे, उमेश शिवणकर, जयेश जवंजाळकर, पोलीस अंमलदार निलेश चव्हाण, विनोद मैंद, विकास रणदिवे, सतिश कोचे, रजत ठाकरे यासह अन्य पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देत घटनेचा पंचनामा केला. लाखांदूर पोलिसांनी याप्रकरणी सखोल तपास सुरू केला असून आरोपीला ताब्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले आहे. परिसरात या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.