भंडारा : लाखांदूर तालुक्यातील कुडेगाव येथे सुशांत ईश्वर उपरीकर ( 3 ) हा चिमुकला घराजवळ नाल्याच्या काठावर शौचास बसला होता. अचानक त्याचा पाय घसरून तो नाल्यात पडला व वाहत जात बुडून त्याचा मृत्यू झाला. ही घटना रविवारला सकाळी २७ जुलै रोजी घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की कुडेगाव येथील ईश्वर उपरीकर यांचे मांदेड कुडेगाव रस्त्यावर नाल्या शेजारी घर आहे. आज सकाळी उपरीकर यांच्या पत्नीने मुलगा सुशांतला नाल्याच्या काठाजवळ शौचालयला बसवून पाणी आणण्यासाठी ती घरात गेली. याच दरम्यान सुशांत याचा तोल जाऊन तो पाण्यात पडला . नाला तुडुंब भरून असल्याने तो जवळपास 200 मीटर अंतरावर वाहत गेला. दरम्यान आईने येऊन बघितले असता त्या ठिकाणी सुशांत न दिसल्याने तिने आरडाओरड केला. आवाज ऐकून परिसरातील नागरिकांनी धाव घेतली आणि शोध मोहीम सुरू केली. तब्बल चार तासांच्या प्रयत्नाने त्याचा मृतदेह आढळून आला.
घटनेची माहिती पोलिसांना मिळताच घटनास्थळी दाखल झाले. व मृतदेह व शवविच्छेदनासाठी लाखांदूर येथे पाठवण्यात आले . यावेळी लाखांदूर चे तहसीलदार वैभव पवार व पोलीस निरीक्षक सचिन पवार घटनास्थळी उपस्थित होते .