

Wainganga river bridge bike accident
भंडारा: वैनगंगेवरील जुन्या पुलावरुन जात असताना अचानक संतुलन बिघडल्याने दुचाकीसह दोघे जण नदीत बुडाले. त्याचदरम्यान नदीवर आंघोळीसाठी आलेल्या तैराकी मित्र मंडळाच्या सदस्यांनी क्षणाचाही विलंब न लावता बचावकार्य राबवून दोघांनाही नदीतून बाहेर काढले. ही घटना आज (दि. १९) सकाळी ९.३० वाजता घडली.
गडेगाव लाखनी येथील रहिवासी सुकराम फसाटे व जितेंद्र सपाटे हे भंडारा जिल्हा दूध संघाचे कर्मचारी आहेत. हे दोघेही दुचाकीने भंडारा येथे कार्यालयात जाण्यासाठी दुचाकीने निघाले होते. वैनगंगेवरील जुन्या पुलावरुन जात असताना अचानक त्यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकीसह दोघेही थेट नदीत कोसळले.
पुलावरून जाणाऱ्या लोकांनी आरडाओरड केल्यानंतर नदीवर आंघोळीसाठी गेलेले तैराकी मित्र मंडळाचे सदस्य अनिल लांबट, प्रशांत कारेमोरे, जितू हलमारे यांनी धावत येऊन पुलावरून नदीत उडी घेतली. जवळच्या हनुमान मंदिरात ठेवलेली दोरी व लाईफ जॅकेट घेऊन रवी गिल्लोरकर, अमोल शहारे, ताराचंद कटारे हे पोहोचले. त्यांनी लाईफ जॅकेट व दोरखंड पाण्यात फेकले. दोघांनाही लाईफ जॅकेट पाण्यातच घालून देण्यात आले. त्यानंतर दोरखंडाच्या मदतीने पुलावरून त्यांना सुखरूप काठापर्यंत ओढत नेऊन दोघांचेही जीव वाचविले. मदतीसाठी धावून जाणारे सर्व वैनगंगा तैराकी मित्र मंडळाचे सदस्य आहेत. या सदस्यांनी यापूर्वीही नदीमध्ये बुडणाऱ्या शेकडो लोकांचे प्राण वाचविले आहेत.
वैनगंगेवरील जुना पूल धोकादायक झाल्याने या पुलावरुन वाहतूक करू नये, असे निर्देश प्रशासनाकडून देण्यात आले असले तरी हलके वाहनचालक, पायदळ जाणारे नागरिक याच पुलाचा वापर करतात. अलीकडेच आलेल्या पुरामध्ये हा पूल पूर्णपणे बुडाला होता. त्यामुळे हा पूल ठिकठिकाणाहून उखडला गेला आहे. साधी दुचाकीसुद्धा चालविणे जीवावर बेतणारे आहे. तरीसुद्धा या पुलावरुन वाहतूक सुरूच आहे. याशिवाय, पुलावरील कठडे अनेक वर्षांपासून लावण्यात न आल्याने जिल्हा प्रशासनाच्या कारभारावरसुद्धा नाराजी व्यक्त केली जात आहे.