निलज फाटा येथे स्कूल बसचा अपघात 
भंडारा

Bhandara Accident |२२ विद्यार्थी बचावले : नियंत्रण सुटल्याने स्कूलबसचा अपघात

विद्यार्थी किरकोळ जखमी, चालकाचे प्रसंगावधान, निलज फाटा येथील घटना

पुढारी वृत्तसेवा

भंडारा: विद्यार्थ्यांना पवनीवरून भिवापूर येथे घेऊन निघालेली स्कूलबस अनियंत्रित होऊन झाडाला धडकली. यात २२ विद्यार्थी किरकोळ जखमी झाले. ही घटना पवनी तालुक्यातील निलज फाटा येथे आज गुरूवारी (दि.६) सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास घडली. बसमध्ये एकूण २२ विद्यार्थी आणि एक केअरटेकर असे २३ जण होते.

विद्यानिकेतन इंग्लिश मीडियम स्कूल, भिवापूर या शाळेची स्कूलबस दररोजच्या प्रमाणे पवनीवरून विद्यार्थ्यांना शाळेत नेत असताना ही घटना घडली. स्कूलबस चंद्रपूर-भिवापूर मार्गावरील निलज फाटा परिसरातून जात असताना समोरून भरधाव वेगात टिप्पर बसच्या दिशेने आल्याने बसचालकाने तात्काळ बस बाजूला घेतली. त्यावेळी बसचे नियंत्रण सुटल्याने बस रस्त्यालगतच्या झाडावर आदळली. अपघातात विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापत झाली असून मोठी दुर्घटना टळली.

अपघातानंतर घटनास्थळी पालक आणि ग्रामस्थांची मोठी गर्दी झाली. विद्यार्थ्यांना सुखरूपपणे बसमधून बाहेर काढून तातडीने ग्रामीण रुग्णालय, भिवापूर येथे हलविण्यात आले. तेथे सर्व विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. डॉक्टरांनी सर्व विद्यार्थी सुरक्षित असून केवळ किरकोळ दुखापत झाल्याचे स्पष्ट केले.

पालकांना दिलासा

अपघातानंतर काही पालक आणि ग्रामस्थांनी चालक मद्यप्राशन करून वाहन चालवत असल्याचा संशय व्यक्त केला होता. मात्र, वैद्यकीय तपासणीनंतर चालक नशेत नसल्याचे स्पष्ट झाले. चालकाच्या सावधगिरीमुळे आणि तत्पर निर्णयामुळे मोठी दुर्घटना टळल्याचे सांगण्यात आले. पालक आणि ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबद्दल दिलासा व्यक्त केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT