

भंडारा- नागपूर- रायपूर महामार्गावर मंगळवारी रात्री झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघाताच्या घटनेत एक जण ठार तर दुसरा गंभीर जखमी झाला. पहिल्या घटनेत रेती वाहून नेणाऱ्या भरधाव टिप्परने स्कुटीस्वाराला चिरडले. राजू देवदास भोयर (४५) रा. गुंथारा असे मृतकाचे नाव आहे. ते एम.एच.३६ टी. ७६५३ क्रमांकाच्या स्कुटीने लाखनीकडून स्वगावी जात असताना विरुद्ध दिशेने आलेल्या रेतीने भरलेल्या एम.एच.४० सीएम ७७५० क्रमांकाच्या भरधाव टिप्परने त्यांना जबर धडक दिली.
यात राजू हे दहा फुट अंतरापर्यंत रस्त्यावरून घासत गेले. त्यांच्या स्कुटीचा पार चुराडा झाला. हा अपघात मंगळवारी रात्री ६ वा ४० मिनिटांच्या सुमारास घडला. यात राजू भोयर यांचा मृत्यू झाला.
दुसरा अपघात महामार्गावरील राजेगाव एमआयडीसीजवळ सायंकाळी ७ .२० वाजेच्या सुमारास घडला.
पुरुषोत्तम लटारू रामटेके (६०) रा. राजेगाव हे भंडाराच्या दिशेने पायी जात असताना समोरून येणाऱ्या अज्ञात मोटरसायकलने त्यांना जबर धडक दिली. धडक लागल्यामुळे पुरुषोत्तम यांच्या डाव्या पायाची हाडे तुटली. घटनेची माहिती मिळताच जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य संस्थानची रुग्णवाहिका दाखल झाली. त्यांना लगेच जिल्हा रूग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले.