भंडारा : भंडारा शहरात बचत गट तयार करण्याच्या आमिषाने महिलांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कल्याणी मते (रा. गणेरापूर, भंडारा) यांनी पोलिस स्टेशन भंडारा येथे तक्रार दाखल केली आहे.
कल्याणी मते यांची ओळख गणेशपूर येथे चालणाºया श्रुतिका ब्युटी पार्लरच्या मालक दिपीका रामलाला ठाकूर (वय ४५, रा. म्हाडा कॉलनी, भंडारा) यांच्याशी झाली होती. या ओळखीचा फायदा घेत दिपीका ठाकूर हिने कल्याणी मते व इतर महिलांना महिला बचत गट तयार करून प्रत्येकाकडून दरमहा १०० रुपये जमा करावे लागतील, त्यामुळे शासनाच्या योजनांचा लाभ मिळेल असे सांगून विश्वासात घेतले.
डिसेंबर २०२१ पासून १८ जुलै २०२५ पर्यंत एकूण ६ बचत गटातील महिलांकडून तब्बल २ लाख ८ हजार रुपये रक्कम गोळा करून ती रक्कम बचत गटाच्या खात्यात न भरता स्वत:च्या फायद्यासाठी वापरून अपहार केल्याचे उघड झाले आहे.
दिपीका ठाकूर, बबीता लक्ष्मण देवूळकर आणि ललिता कुंभलकर यांनी बचत गटाचे अधिकृत रजिस्ट्रेशन न करता महिलांची स्वाक्षरी घेऊन बँक आॅफ बडोदा येथून कर्ज काढले. नंतर संबंधित महिलांना बँकेकडून न भरलेल्या कर्जाच्या नोटिसा आल्यावर हा प्रकार उघडकीस आला.
सखी मंच बचत गटाच्या नावे ६ लाख रुपयांचे कर्ज उचलण्यात आले. त्यापैकी ३ लाख ३० हजार रुपयांचे कर्ज थकीत झाले. आशा बचत गटाचे ६ लाखांचे कर्ज उचलून ३ लाख २० हजारांची थकबाकी, कावेरी महिला बचत गटाचे ६ लाखांचे कर्ज घेऊन ३ लाख ५० हजारांची थकबाकी, नमो बुद्धा महिला बचत गटाचे ४ लाखांचे कर्ज उचलून २ लाख थकीत, मैत्री बचत गटाचे ४ लाख ९८ हजार आणि त्याच गटाच्या नावे ५ लाख कर्ज उचलून अनुक्रमे ४ लाख ६८ हजार व २ लाख ७४ हजार रुपये थकीत करण्यात आले.
कल्याणी मते यांच्या रिपोर्टवरून भंडारा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक पंचबुधे करीत आहेत.