

भंडारा : साकोली शहरातील मुंबई-कलकत्ता राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या लघु पाटबंधारे विभागाच्या मुख्य मामा तलावाची पाळ आज पहाटेच्या सुमारास फुटल्याने शहरासह परिसरात पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. तलावाचे पाणी साकोली-चंद्रपूर राष्ट्रीय महामार्गावर आल्याने, पोलीस विभागाने तातडीने वाहतूक बंद केली आहे, जेणेकरून कोणतीही अनुचित घटना घडू नये.
तलावाखालील साकोली आणि गडकुंभली परिसरातील शेकडो हेक्टर शेतजमीन पाण्याखाली गेली असून, भातपिकांची लागवड पूर्णपणे वाहून गेली आहे. याशिवाय, मत्स्यव्यवसाय करणाऱ्या स्थानिकांना मोठा आर्थिक फटका बसला असून, तलावातील मासेही मोठ्या प्रमाणात वाहून गेले आहेत. शहरातील एकोडी रोडवरील नवतलावाची पाळ अत्यंत जीर्ण व नादुरुस्त अवस्थेत आहे. त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाकडे नवतलावाच्या पाळीच्या दुरुस्तीची मागणी केली आहे.
या तलावाची पाळ अनेक वर्षांपासून जीर्ण अवस्थेत होती आणि अनेक ठिकाणी भेगा पडल्या होत्या. शेतकरी व स्थानिकांनी वेळोवेळी लघु पाटबंधारे विभागाकडे दुरुस्तीची मागणी केली होती, मात्र संबंधित विभागाने दुर्लक्ष केल्याने अखेर ही दुर्घटना घडली. यावर्षी उन्हाळ्यात तलावाच्या खोलीकरणाचे काम सुरू होते, मात्र खोलीकरणातून निघालेली माती गैरप्रकारे विकली जात असल्याच्या तक्रारीनंतर काम थांबवण्यात आले होते. या कामादरम्यान, पाळीवरील जुनी दगडी पिचिंग काढून टाकण्यात आली आणि काही प्रमाणात नवीन माती टाकण्यात आली. परिणामी, पाळीला दगडी पिचिंग नसल्याने आणि तलाव तुडुंब भरल्याने पाण्याचा दाब सहन न झाल्याने पाळ फुटली.
या दुर्घटनेमुळे साकोली-चंद्रपूर महामार्गावरील वाहतूक अनेक तास विस्कळीत झाली. तलावाखालील शेतशिवारातील भातपिके वाहून गेली असून, शेतकऱ्यांचा खत, बियाणे, औषधांवरील खर्च वाया गेला आहे. मत्स्यव्यवसायिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. या प्रकारामुळे संतप्त शेतकरी आणि नागरिकांनी लघु पाटबंधारे विभागाच्या अभियंत्यांविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली असून, दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाईची मागणी केली आहे. तसेच, स्थानिक प्रशासनाने तत्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्तांना मदत द्यावी, अशी मागणी शेतकरी संघटनांकडून करण्यात येत आहे.