भंडारा: नगर परिषदांचा कार्यकाळ संपल्याच्या तीन वर्षानंतर होत असलेल्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांमध्ये स्पर्धा आहे. विधानसभेत युती आणि आघाडीचे सूत्र असताना नगर परिषद निवडणुकीत मात्र युती, आघाडी होण्याची सुतराम शक्यता नसल्याची माहिती आहे. उद्या, सोमवारपासून नामनिर्देशनपत्र दाखल करण्यास सुरुवात होत असली तरी नगराध्यक्षपदाचा चेहरा कोण, याबाबत सर्वच पक्षांनी गुप्तता पाळली आहे.
जिल्ह्यातील भंडारा, तुमसर, पवनी आणि साकोली या चार नगर परिषदांच्या निवडणुका २ डिसेंबर रोजी होत आहेत. निवडणुकीची प्रक्रिया, सोमवार १० नोव्हेंबरपासून सुरु होत असून नामनिर्देशनपत्र दाखल होण्यास प्रारंभ होईल. सर्वच राजकीय पक्षांनी नगराध्यक्षपदासोबतच प्रभागनिहाय नगरसेवकांची यादी तयार केली आहे. परंतु, कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब करावा, यावर अजूनही खल सुरू आहे.
सन २०१७ मध्ये नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या होत्या. यामध्ये भंडारा, साकोली आणि तुमसरमध्ये भाजपने सत्ता काबीज केली होती. तर पवनी येथे नगर विकास आघाडीने वर्चस्व सिद्ध केले होते. या नगर परिषदांचा कार्यकाळ २०२२ मध्ये संपला आणि तेव्हापासून चारही नगरपरिषदांमध्ये प्रशासकराज आले. आता राज्य निवडणूक आयोगाने नगर परिषद निवडणुकांचा कार्यक्रम जाहिर करताच राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग आला आहे. भंडारा येथे ३३, तुमसरमध्ये २५, पवनीमध्ये २० तर साकोलीमध्ये २० नगरसेवक निवडून द्यायचे आहेत. युती आणि आघाडीची शक्यता नसल्याने सर्वच राजकीय पक्षाचे उमेदवार तयारीला लागले आहेत. राजकीय पक्षांनी अजूनही उमेदवारांची यादी जाहिर केली नसल्याने इच्छुकांची धाकधूक वाढली आहे.
जिल्ह्यातील चारही नगर परिषदांची निवडणूक स्थानिक आमदारांनी प्रतिष्ठेची केली आहे. भंडारा विधानसभेत भंडारा आणि पवनी या दोन नगरपरिषदांच्या निवडणुका आहेत. येथील स्थानिक आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी या दोन्ही निवडणुका प्रतिष्ठेच्या केल्या आहेत. त्यांच्यापुढे भाजपचे आमदार परिणय फुके यांचे मोठे आव्हान आहे. काही दिवसांपूर्वी दोन्ही नेत्यांमध्ये घडलेले शीतयुद्ध आता शांत झाले असले तरी निवडणूक प्रचारात ते पुन्हा भडकण्याची चिन्हे आहेत. साकोली येथे आ. नाना पटोले यांनी तळ ठोकला आहे. साकोलीतील निवडणूक त्यांच्याच नेतृत्त्वात लढली जात आहे. त्यांच्यापुढेही भाजपचे आमदार परिणय फुके यांचे आव्हान आहे. तुमसरमध्ये आ. राजू कारेमोरे नगर परिषदेत सत्ता स्थापन करण्यास इच्छुक आहेत. त्याहीठिकाणी भाजपचे आ. परिणय फुके यांनी आव्हान तयार केले आहे.
भंडारा नगर परिषद: अध्यक्ष - भाजपा, भाजप १५, कॉंग्रेस ३, राष्ट्रवादी १०, अपक्ष ४.साकोली नगर परिषद: अध्यक्ष - भाजपा, भाजपा ११, कॉंग्रेस १, राष्ट्रवादी १, अपक्ष ४.
तुमसर नगर परिषद: अध्यक्ष - भाजपा, भाजपा १५, राष्ट्रवादी कॉंग्रेस २, कॉंग्रेस ३, अपक्ष ४.
पवनी नगर परिषद: अध्यक्ष - नगर विकास आघाडी, नगर विकास आघाडी ६, कॉंग्रेस - ५, राष्ट्रवादी ३, भाजपा २, शिवसेना १.
नगर परिषद निवडणूक जाहिर होताच पक्षाची उमेदवारी मिळणार नसल्याचे संकेत मिळाल्याने अनेक इच्छुकांनी पक्षांतर केले. यामध्ये सर्वच राजकीय पक्षांचा समावेश आहे. विशेषत: नगराध्यक्षपदाची उमेदवारी मिळणार नसल्याने पक्षांतर करणाºयांचा आकडा मोठा आहे. आता पुन्हा उमेदवारी न मिळाल्याने सर्वच पक्षांमध्ये बंडखोरीचाही धोका आहे.
भाजपा, शिवसेना (दोन्ही गट), राष्ट्रवादी कॉंग्रेस (दोन्ही गट), कॉंग्रेस व अन्य पक्षांनी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या आहेत. उद्यापासून नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार असल्याने सर्वच पक्ष आपल्या उमेदवारांची नावे जाहिर करतील. नगराध्यक्षपदाचा उमेदवार कोण, यावर मात्र सर्वच पक्षांनी सावधगिरी बाळगली आहे.