

Lakhandur father killed by son
लाखांदूर : 'तू आमच्यासाठी काय केले? आतापर्यंत आमचे लग्न करुन दिला का?' असे म्हणत शिवीगाळ करीत वडिलांच्या डोक्यावर विटेचा तुकडा मारल्याने वडिलांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (दि. ७) रात्री ९ वाजताच्या सुमारास लाखांदूर तालुक्यातील आथली येथे घडली. पुरुषोत्तम विश्वनाथ कुंभलवार (वय ५७, रा. आथली, ता. लाखांदूर) असे मृत वडिलाचे नाव आहे. तर प्रदीप पुरुषोत्तम कुंभलवार (वय ३३) असे आरोपी मुलाचे नाव आहे.
पोलिस सूत्रानुसार, घटनेच्या दिवशी रात्रीच्या सुमारास जेवण झाल्यानंतर, लहान मुलाने 'तु आमच्यासाठी काय केलास, आतापर्यंत आमचे लग्न करुन दिला का' असे म्हणुन वडिलांना शिवीगाळ करणे सुरू केले. त्यावर वडिलांनी 'मी तुमच्यासाठी काहीच केलो नाही का, तुच राबतेस का, मी राबत नाही का?' असे म्हणताच अचानक रागाच्या भरात मुलगा प्रदीपने स्वंयपाक खोलीत असलेला विटेचा तुकडा उचलला व वडिलांच्या डोक्यावर मारला. त्यामुळे, वडिलांच्या डोक्याला जबर मार लागुन रक्तस्त्राव होऊ लागला. दरम्यान त्यांना उपचारार्थ लाखांदूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तिथे डॉक्टरनी त्यांना तपासून मृत घोषित केले.
या घटनेची माहिती लाखांदूर पोलिसांना देण्यात आली. या माहितीवरून लाखांदूर पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळी पोहोचले व पंचनामा करून मृतदेह पुढील तपासासाठी हलविण्यात आला. या घटनेत मृताच्या पत्नीच्या फिर्यादीवरून आरोपी मुलाविरूद्ध लाखांदूर पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, आरोपी मुलगा प्रदीप पुरुषोत्तम कुंभलवार याला अटक करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस स्टेशन लाखांदूर करीत आहेत.