भंडारा: पुढारी वृत्तसेवा : ग्रामसेवकाच्या विरोधात असलेला आक्षेप हटविण्यासाठी १० हजार रुपयांची लाच घेणाऱ्या साकोली पंचायत समितीच्या विस्तार अधिकाऱ्याला भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. ही कारवाई आज (दि.२) करण्यात आली.
खिलेंद्र देवरलाल टेंभरे (वय ५३) असे लाचखोर विस्तार अधिकाऱ्याचे नाव आहे. Bhandara News
यातील तक्रारदार हे ग्रामसेवक आहेत. ते साकोली तालुक्यातील किन्ही (मोखे) ग्रामपंचायत येथे कार्यरत असताना २०१८-१९ मध्ये रस्ता डांबरीकरणाच्या कामासाठी १५० टिन डांबर हे ३ हजार रुपये प्रति टिन या दराने निविदा मागवून ग्रामपंचायतव्दारे खरेदी करण्यात आले होते. २०२३ मध्ये किन्ही ग्रामपंचायतचे ऑडिट झाले. सदर ऑडिट रिपोर्टमध्ये तक्रारदार ग्रामसेवक यांनी १ हजार रुपये प्रति टिन डांबर प्रमाणे खरेदी न करता ३ हजार रुपये प्रति टिन या दराने डांबर खरेदी केल्याचा आक्षेप नोंदविण्यात आला होता. विस्तार अधिकारी खिलेंद्र देवरलाल टेंभरे यांनी तक्रारदार ग्रामसेवक यांना रस्ता डांबरीकरणाचे कामामध्ये मंजूर दरापेक्षा ३ लाख रुपये जास्त प्रदान केल्याने ३ लाखांची वसूली तुमच्याकडून केली जाणार, असे ग्रामसेवक यांना सांगितले. ही वसुली त्यांच्याकडून होऊ द्यायची नसेल आणि जिल्हा परिषदेस सदर ३ लाख रुपये वसुलीबाबतचा अहवाल न पाठवता, आक्षेपाचा निपटारा करुन तसा अहवाल पाठवायचा असेल, तर त्या मोबदल्यात विस्तार अधिकारी खिलेंद्र देवरलाल टेंभरे यांनी १० हजार रुपये लाचेची मागणी गेली. Bhandara News
तक्रारदार यांची १० हजार रुपये देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रारदार दाखल केली. तक्रारीनुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चौकशी केली असता १० हजार रुपये मागणी केल्याचे निष्पन्न होऊन सापळा रचण्यात आला. सापळा करवाई दरम्यान खिलेंद्र टेंभरे यांनी १० हजार रुपये लाच रक्कम तक्रारदार यांच्याकडून पंचासमक्ष स्वीकारले. त्यावेळी त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक नागपूर परिक्षेत्र नागपूर पोलीस अधीक्षक राहुल माकणीकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपविभागीय अधीक्षक डॉ. अरुणकुमार लोहार, पोलीस निरीक्षक कमलेश सोनटक्के, पोलीस हवालदार मिथून चांदेवार, पोलीस नायक अतुल मेश्राम, पोलीस नायक नरेंद्र लाखडे, पोलीस शिपाई विवेक रणदिवे, चालक पोलीस शिपाई राहुल राऊत, पोलीस निरीक्षक अमित डहारे, पोलीस उपनिरीक्षक संजय कुंजरकर, पोलीस हवालदार गोस्वामी, पोलीस नायक शिलपेंद्र, पोलीस शिपाई चेतन पोटे, पोलीस शिपाई मयूर सिंगनजूडे, पोलीस शिपाई राजकुमार लेंडे, पोलीस शिपाई अभिलाषा गजभिये यांनी केली.
हेही वाचा