Crime News Pudhari
भंडारा

Bhandara crime | हनुमान मंदिरात मूर्तींची विटंबना; गणपती-शंकर मूर्तींची तोडफोड करून फेकल्या

बसस्टॉपसमोरील मंदिरात मध्यरात्री समाजकंटकांचा हैदोस 

पुढारी वृत्तसेवा

भंडारा : साकोली शहरातील बसस्टॉपसमोरील हनुमान मंदिरात अज्ञात समाजकंटकांनी घुसून गणपती व भगवान शंकर यांच्या मूर्तींची तोडफोड केल्याची अत्यंत दुर्दैवी व भावनांना ठेच पोहोचवणारी घटना उघडकीस आली आहे. मंदिरातील मूर्ती खाली फेकून त्यांची विटंबना करण्यात आली असून इलेक्ट्रिक बोर्ड, पडदे तसेच इतर साहित्याचीही नासधूस करण्यात आली आहे. आज सकाळी पूजा-अर्चनेसाठी आलेल्या भाविकांना हा प्रकार निदर्शनास येताच परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेमुळे भाविकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध नोंद घेऊन  तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, साकोली बसस्टॉप परिसरातील हनुमान मंदिरात मध्यरात्रीच्या सुमारास समाजकंटक अज्ञात  व्यक्तींनी प्रवेश करून मंदिरातील गणपती आणि शंकराच्या मूर्तींची तोडफोड केली. मूर्ती मंदिराच्या आतील भागातून खाली फेकण्यात आल्या असून त्यांचे तुकडे परिसरात विखुरलेले आढळून आले. केवळ धार्मिक मूर्तींचीच नव्हे तर मंदिरातील इतर साहित्याचीही मोठ्या प्रमाणावर नासधूस करण्यात आल्याचे दिसून आले.

तोडफोड करणाऱ्यांनी मंदिरात लावलेला इलेक्ट्रिक बोर्ड फोडून नुकसान केले. तसेच दारावरील पडदे फाडून फेकण्यात आले. मंदिरातील साहित्य अस्ताव्यस्त करून श्रद्धास्थानाचा अवमान केल्याचे चित्र सकाळी भाविकांच्या निदर्शनास आले. या घटनेने अनेकांच्या भावना दुखावल्या असून नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

दररोजप्रमाणे सकाळी पूजा करण्यासाठी आलेल्या भाविकांनी मंदिराची झालेली अवस्था पाहताच धक्का व्यक्त केला. मंदिर हे श्रद्धा, विश्वास आणि सामाजिक ऐक्याचे प्रतीक असताना अशा प्रकारची घटना घडल्याने नागरिकांमध्ये वेदना आणि अस्वस्थता निर्माण झाली आहे. अनेक भाविकांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली.

घटनेची माहिती मिळताच साकोली पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मंदिर परिसराची पाहणी करून पंचनामा केला असून अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्ह्याची नोंद घेतली आहे. परिसरातील उपलब्ध पुरावे आणि इतर बाबींच्या आधारे तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

या घटनेनंतर विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, विविध सामाजिक संघटना तसेच सर्वपक्षीय प्रतिनिधींनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे. धार्मिक स्थळांची पवित्रता जपणे ही समाजाची सामूहिक जबाबदारी असून अशा घटना सामाजिक सलोखा आणि शांततेस बाधा आणणाऱ्या असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. दोषींना तातडीने अटक करून कठोर शिक्षा करण्यात यावी, अशी एकमुखी मागणी नागरिकांकडून होत आहे. सध्या साकोली पोलिसांकडून अज्ञात आरोपींचा शोध सुरू असून या संवेदनशील प्रकरणाचा सर्वंकष तपास केला जात आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता शांतता व संयम राखून पोलिस तपासाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT