विदर्भ

भंडारा: वाघाच्या मृत्यूप्रकरणी तिघांना अटक; वाघ नखे, हाडे जप्त

अविनाश सुतार

भंडारा: पुढारी वृत्तसेवा : नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पांतर्गत येणाऱ्या कोका अभयारण्यातील वाघाच्या मृत्यूप्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींच्या ताब्यातून वाघाची ७ नखे, मनक्याचे हाड, एका पायाचे हाड आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. आरोपींना वनकोठडी सुनावण्यात आली आहे.

२६ मार्चरोजी कोका अभयारण्यात वाघाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत दिसून आला होता. याप्रकरणी वन विभागाने गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. वाघाच्या शवविच्छेदनाच्या अहवालानुसार वाघाचा मृत्यू विषबाधेमुळे झाल्याचे दिसून आले. तथापि, तपासादरम्यान कोका अभयारण्याचे सहाय्यक वनसंरक्षक रोशन राठोड व वनपरिक्षेत्र अधिकारी महादेव माकडे यांनी लाखनी तालुक्यातील परसोडी येथील नरेश गुलाबराव बिसने (५४) व मोरेश्वर सेगो शेंदरे (६४) यांना अटक केली. या दोघांनाही वनकोठडी देण्यात आली आहे.

३० मार्चरोजी लाखनी तालुक्यातील खुर्शीपार येथील वशिष्ठ गोपाल बघेले (वय ५९) याला वाघाच्या शिकारीप्रकरणी चौकशीसाठी कोका वनपरिक्षेत्र कार्यालयात बोलविण्यात आले होते. चौकशीदरम्यान बघेले हा सुद्धा वाघाच्या शिकारीत सामील असल्याचे दिसून आल्याने त्यालाही अटक करण्यात आली. आरोपींकडून ६ वाघ नखे हस्तगत करण्यात आली. आतापर्यंत एकूण ७ नखे, १ मनक्याचे हाड व १ पायाचे हाड तसेच अन्य साहित्य जप्त करण्यात आले आहे.

या प्रकरणात नवेगाव-नागझिराचे क्षेत्रसंचालक जयराम गौडा, उपसंचालक पवन जेफ, सहाय्यक वनसंरक्षक रोशन राठोड, गस्ती पथकाचे वनपरिक्षेत्र अधिकारी संजय मेंढे, सचिन नरळ यांच्या मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकारी महादेव माकडे तपास करीत आहेत.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT