भंडारा: गोंडीटोला येथे अतिक्रमणधारकांचा वनाधिकारीसह कर्मचाऱ्यांवर प्राणघातक हल्ला | पुढारी

भंडारा: गोंडीटोला येथे अतिक्रमणधारकांचा वनाधिकारीसह कर्मचाऱ्यांवर प्राणघातक हल्ला

भंडारा: पुढारी वृत्तसेवा : शासकीय वन जमिनीवरील अतिक्रमण हटवण्याकरिता गेलेल्या वन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पथकावर सुमारे २० ते २५ अतिक्रमधारकांनी लाठ्याकाठ्या घेऊन हल्ला केला. एवढेच नाही, तर तुमसर वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या शासकीय वाहनावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्नही केला. अश्लिल शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. ही गंभीर घटना तुमसर तालुक्यातील गोंडीटोला (सुकळी) येथे शुक्रवारी (दि. २४) घडली. या घटनेमुळे सिहोरा-बपेरा परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

तुमसर वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या बपेरा (सि.) वन परीक्षेत्रातील मौजा गोंडीटोला (सुकळी) येथील गट क्रमांक २३ व २६/२ मध्ये १५ ते २० आदिवासी लोकांनी शासकीय जागेवर काही दिवसांपूर्वी अतिक्रमण केले होते. त्यांना वारंवार तोंडी व लेखी सूचना देऊनही अतिक्रमण सोडले नाही. याप्रकरणी आतापर्यंत ४ वन गुन्हे दाखल केले आहेत.

दरम्यान, शुक्रवारी सोंड्या येथील बीटरक्षक डी. ए. कहुलकर, बीटरक्षक ए.जे. वासनिक, डी.जे. उईके, वनरक्षक ए.डी. ठवकर व वन मजूर इमारचंद शिवणे यांचे पथक सकाळी १०. ३० वाजेच्या दरम्यान गस्तीवर असताना त्यांना गोंडीटोला (सुकळी) गट क्रमांक २३ व २६/२ मध्ये वीस ते पंचवीस व्यक्ती घटनास्थळी ट्रॅक्टरच्या सहाय्याने नांगरटी करून धुरे बनवित असताना आढळून आले. बीटरक्षक कहुळकर यांनी अतिक्रमणधारकांना ट्रॅक्टर बाहेर काढण्याकरिता सांगितले असता त्यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली.

यानंतर वनपरिक्षेत्राधिकारी छगन रहांगडाले हे शासकीय वाहनाने कर्मचाऱ्यांना अतिक्रमणस्थळी घेऊन गेले असता जमाव कायमच होता. या शासकीय जमिनीवर अतिक्रमण करू नका, असे सांगून त्यांना मज्जाव केला असता वीस ते तीस महिला व पुरुषांच्या जमावाने लाठ्याकाठ्या, पेट्रोलची बाटली घेऊन कुऱ्हाडीने वनकर्मचाऱ्यांवर हल्ला केला. यात ५ वन कर्मचारी जखमी झाल्याची माहिती आहे. याप्रकरणी पोलिसांनी १० ते १२ व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केले असून पुढील तपास सुरू आहे.

धक्काबुक्की व धमकी

वनपरिक्षेत्र अधिकारी छगन रहांगडाले व बीटरक्षक कहुळकर यांचे कॉलर पकडून जमावाने धक्काबुक्की केली. इतर कर्मचाऱ्यांना तत्काळ निघून जा, अन्यथा तुम्हाला कुऱ्हाडीने तोडून टाकू व पेट्रोल टाकून पेटवून देऊ, अशी धमकी दिल्याची तक्रार पोलिसात करण्यात आली आहे. एवढेच नाही, तर जमावाने एमएच ३६ के १८१ या शासकीय वाहनावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. दगडफेकही केली.

हेही वाचा 

Back to top button