भंडारा: पुढारी वृत्तसेवा : साकोली तालुक्यातील पापडा खुर्द येथील श्रद्धा किशोर सिडाम या आठ वर्षीय बालिकेचा खून करुन तिचा मृतदेह तणसीच्या ढिगाऱ्यात जाळल्याप्रकरणी तिच्याच चुलतभावाला आज (दि.३) पोलिसांनी अटक केली. अजय पांडुरंग सिडाम (वय २५, रा. पापडा खुर्द) असे अटक केलेल्या चुलतभावाचे नाव आहे.जिल्ह्यात खळबळ उडवून देणाऱ्या या खूनप्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. श्रद्धाचा खून का केला ? यात आणखी कुणाचा सहभाग आहे का ?, याचा पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
अजय सिडाम श्रद्धाच्या घराच्या शेजारीच राहतो. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २८ नोव्हेंबर रोजी दुपारी दीडच्या सुमारास श्रद्धा शाळेतून परतली. दुपारी ४.३० च्या सुमारास ती घराबाहेर आवारात खेळण्यासाठी गेली. त्यानंतर ती परतलीच नाही. ती बेपत्ता झाल्याची तक्रार साकोली पोलिसांत दिली.
त्याच रात्री १०.३० वाजता पोलीस अधीक्षक लोहित मतानी स्वत: आपल्या ताफ्यासह पापडा खुर्द गावी पोहोचून श्रद्धाची शोध मोहीम सुरू केली. श्वान पथकाचीही मदत घेण्यात आली. परंतु, तिचा कुठेही शोध लागला नाही. पोलिसांनी शोधमोहीमेमध्ये गावातील प्रत्येक घर व गावाजवळील परिसर पिंजून काढला होता. दरम्यान ३० नोव्हेंबररोजी सकाळी ७ च्या सुमारास श्रद्धाच्या घराच्या मागील भागात असलेल्या शेतातील तणसीच्या ढिगाऱ्यात एका पोत्यामध्ये श्रद्धाचा मृतदेह पूर्णपणे जळालेल्या स्थितीत आढळून आला.बेपत्ता श्रद्धाचा असा करुण अंत झाल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली होती.
पोलिसांनी ही घटना गांभीर्याने घेत संपूर्ण यंत्रणा कामाला लावली. पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, श्वानपथक व अन्य तपास यंत्रणांच्या मदतीने आरोपीचा शोध घेणे सुरू झाले. परंतु, पोलिसांना आरोपी सापडत नसल्याने जनक्षोभ वाढत होता. अखेरीस शनिवारी पोलिसांच्या तपासाला यश आले आणि श्रद्धाच्या घराच्या शेजारी राहणारा तिचा चुलत भाऊ अजय पांडूरंग सिडाम याला पोलिसांनी अटक केली. तपास साकोलीचे पोलीस निरीक्षक बोरकर करीत आहेत.
हेही वाचा :