

भंडारा: पुढारी वृत्तसेवा : भंडारा-बालाघाट राष्ट्रीय महामार्गावरील हरदोली (सिहोरा) गावात गत ४० वर्षापासून रहस्यमय आगीचे तांडव सुरू आहे. यावर्षी रहस्यमय आगीने गावातील तीन शेतकऱ्यांंच्या तनीस ढिगांची राखरांगोळी केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह गावकरी भयभीत झाले आहेत. ४० वर्षांपासून सुरू असलेल्या या आगीचे रहस्य कायम असून वैज्ञानिक युगात यंत्रणेला आव्हान ठरले आहे.
हरदोली (सिहोरा) गावात गत ४० वर्षांपासून धान, तनीस, आणि घरांना रहस्यमय आग कवेत घेत आहे. गावातील शेतशिवारात ठेवण्यात आलेल्या धानाचे ढीग, तनसीच्या ढिगांना रहस्यमय आग लागत आहे. कवेलू आणि मातीच्या घरांना आग लागली आहे. परंतु सिमेंट काँक्रीट घरांना अद्यापपर्यंत आग लागलेली नाही. त्यामुळे आता गावकरी सिमेंट काँक्रीटच्या घर बांधकामाकडे वळले आहेत.
आगीच्या भीतीमुळे उभे धान पीक कापल्यानंतर तत्काळ थ्रेसर मशीनच्या सहाय्याने मळणी करण्यात येत आहे. तनीस शेतशिवारात ढीग तयार करून ठेवताच अग्नितांडव सुरू होते. यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यावर्षी गावातील शेतकरी देवचंद बिसने, धोंडोजी रहांगडाले व बालचंद शरणागत यांच्या शेतातील तनसीचे ढीग जळाल्याने गावकरी दहशतीच्या सावटाखाली वावरत आहेत.
हेही वाचलंत का ?