विदर्भ

नागपूर : जिल्ह्याच्या पाणी टंचाई प्रस्तावित आराखड्यात ४३ टक्क्यांची वाढ!

अमृता चौगुले

नागपूर, पुढारी वृत्‍तसेवा : उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये जिल्ह्याच्या ग्रामीण भागात निर्माण पाणीटंचाई होते. यंदा जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने जिल्ह्यातील तीन टप्प्यातील पाणीटंचाईसाठी प्रस्तावित २९ कोटी १२ लक्ष ५७ हजार रुपयांचा आराखडा तयार केला आहे. हा आराखडा गतवर्षीच्या तुलनेत तब्बल ४३ टक्क्यांनी वाढल्याचे दिसून येत आहे. गतवर्षातील टंचाई आराखडा केवळ २०.४१ कोटीच्या घरात होता. यंदाच्या प्रस्तावित आराखड्यामध्ये ९३६ गावांमध्ये १७१० पाणी पुरवठ्याशी संबंधित विविध उपाययोजनांची कामे करण्यात येणार आहे.

दरम्‍यान, गेल्या दोन वर्षांपासून नागपूर जिल्ह्याच्या टंचाई आराखड्यातुन 'आऊट' असलेल्या बोअरवेल यंदा मोठ्या प्रमाणात करण्यात येणार असून, फ्लशिंगचाही यंदा आराखड्यात समावेश करण्यात आला आहे. यंदाच्या पाणीटंचाई कृती आराखड्यात जिल्ह्यातील ९३६ वर गावांमध्ये ही पाणी टंचाईची कामे होणार आहेत. यामध्ये नळयोजना विशेष दुरुस्ती, विंधन विहीर विशेष दुरुस्ती, नवीन विंधन विहीर घेणे, टँकर, खासगी विहीर अधिग्रहण, बुडक्या घेणे, गाळ काढणे, विहिरींचे खोलीकरण आदी उपाययोजनांची कामे होणार आहेत. यामध्ये पहिल्या १.४४ लाखाच्या आराखड्यास मंजूरी प्रदान झाली आहे. प्रस्तावित दुसऱ्या आणि तिसऱ्या सुमारे २९ कोटीवरील आराखड्याची फाईल लवकरच ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून जिल्हाधिकाऱ्याकडे सादर होणार आहे.

पाणी टंचाईच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये ५७६ गावांमध्ये ११७३ उपाययोजना करण्यात येणार असून, यासाठी प्रस्‍तावित आराखड्यात २३ कोटी ७४ लाख ३९ हजार प्रस्तावित आहेत. तर शेवटच्या टप्प्यात ३५८ गावांमध्ये ५३५ उपाययोजनांवर ५ कोटी ३६ लाख ७४ हजाराची कामे प्रस्तावित आहेत.

जि.प.मध्ये सत्तांतरण झाल्यापासून (वर्ष २०२०) नवीन बोअरवेल करण्यापेक्षा आहे त्या बोअरवेललाच पुनर्जीवित करून पाण्याचा स्रोत म्हणून वापरण्यासाठी बोअरवेलचे 'फ्लशिंग' करण्यावर भर होता. त्यामुळे पाण्याचा उपसा मर्यादित राहतो व नव्याने बोअरवेल करण्याची गरजही भासत नव्हती. सोबतच बोअरवेलवर होणारा अतिरिक्त खर्च टाळता येत होता. त्यामुळे दरवर्षी टंचाई आराखड्यावर लागणारा निधीही घटत होता.

वर्ष २०२०-२१ मध्ये जिल्ह्याचा टंचाई आराखडा ३१.५५ कोटी होता. २०२१-२२ मध्ये त्यात आणखी घट झाली, २०२२-२३ मध्ये तो २० कोटी ४१ लाखापर्यंत राहिला. यावेळी आराखड्यात आणखी घट अपेक्षित होती. परंतु यंदाचा आराखडा हा तब्बल ४३ टक्क्यांनी वाढला आहे. यंदा दोन वर्षानंतर पुन्हा एकदा नव्याने २१७ बोअरवेल करण्यात येणार आहेत. यापूर्वीच जिल्ह्यातील ७६८ ग्राम पंचायतीअंतर्गत १५६० वर गावांमध्ये ९६२६ बोअरवेल आहेत.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT