अमरावती, पुढारी वृत्तसेवा : वन्यप्राण्यांपासून शेतातील पिक वाचविण्यासाठी लावलेल्या विद्युत तारांच्या स्पर्श झाल्याने धारणी तालुक्यात काका-पुतण्याचा बळी घेतला आहे. जयराम मावस्कर (वय ३४) व दुर्गेश रमेश धांडे (वय १६) असे मृतांचे नाव आहे. ही घटना धारणी तालुक्यातील हरिसाल जवळील कोठा शेतशिवारात सोमवारी (दि.9) सकाळी उघडकीस आली. विद्युत तारेतील विज प्रवाहाचा जोरदार धक्का लागल्यानंतर दोघेही जागेवरच गतप्राण झाले.या घटनेमुळे धारणी तालुक्यात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी चौकशी सुरु केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या जंगलातील वन्यप्राणी स्थानिक शेतकऱ्यांच्या पिकांची नासधूस करतात. त्यामुळे वन्य प्राण्यांपासून पिक वाचवण्यासाठी कोठा गावातील शेतकरी सोहनलाल रामलाल धुर्वे यांनी शेताच्या चारही बाजुने तारेचे कुंपण तयार केले आहे. त्यात विजेचा प्रवाह सोडला होता. अशातच रविवारी (दि.८) गावातील शिवलाल दुर्गेश हे दोघेही काही कामानिमित्त जंगलात गेले होते. दरम्यान त्यांचा जिवंत विद्युत तारांना स्पर्श झाला. त्यामुळे दोघांनाही तारेतील विद्युत प्रवाहाचा जोरदार झटका बसला. यात दोघांचाही जागेवरच मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनीही घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. सद्यस्थितीत याप्रकरणात पोलिसांनी आकस्मीक मृत्यूची नोंद केली आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच धारणी पोलीस आणि महावितरणचे अधिकारी घटनास्थळावर पोहोचले होते.