वाई बाजार : ऐन बैलपोळा सणादिवशी विद्यूत तारेचा शॉक लागून बैलासह शेतक-याचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना आज (दि.२) माहूर तालुक्यातील मौजे हिवळणी येथे घडली. विलास धारासिंग राठोड (३१) असे या मृत शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेमुळे तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, बैलपोळा सणादिवशी सोमवारी विलास राठोड हे बैलांना शेतातून घेऊन घरी येत होते. यादरम्यान एका बैलाचा पाय विजेच्या तारेत आडकला. त्याला सोडविण्यासाठी विलास राठोड गेले होते. यादरम्यान बैलासह त्यांना विजेचा जोराचा झटका लागल्याने दोघांचाही जागीच मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे हिवळणी येथे पोळा सणाच्या उत्साहावर विरजण पडले असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच सिंदखेड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर राठोड यांचा मृतदेह आष्टा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शविच्छेदनासाठी पाठविण्यात आला.