वर्धा, पुढारी वृत्तसेवा : जिल्हयामध्ये वेगवेगळया भागात रविवारी (दि.१४) विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली. यादरम्यान वीज कोसळून दोन दुर्घटना घडल्या आहेत. यामध्ये कोटंबा शिवारात वीज पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. तर नागठाणा शिवारात वीज पडल्याने बैलजोडी मृत्युमुखी पडली.
रविवारी वर्धा शहरासह इतरही भागात जोरदार पाऊस झाला. दुपारच्या सुमारास सेलू परिसरात विजांच्या कडकडाटासह पाऊस आला. शेतकरी मोरेश्वर वांदिले पाऊस आल्याने झाडाखाली उभे होते. दरम्यान त्याच्या अंगावर वीज पडली. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच शेताकडे अनेकांनी धाव घेतली. घटनास्थळी जाऊन मृतकाला सेलूच्या ग्रामीण रुग्णालयात आणले. सेलू पोलिसांनी रुग्णालयात येऊन घटनेची माहिती घेत पंचनामा केला.
दुसरी घटना नागठाणा शिवारात घडली. नागठाणा शिवारात वीज पडून बैलजोडी ठार झाली. आकरे यांच्या मालकीची बैलजोडी शेतात असताना वीज पडली. त्यात बैलजोडीचा जागीच मृत्यू झाला. ऐन हंगामाच्या सुरूवातीलाच बैलजोडी वीज पडून ठार झाल्याने शेतकर्यापुढे पुढील नियोजनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. पावसाच्या जोरदार सरीमुळे नागरिकांची तारांबळ उडाली. शहरात काही भागात रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होते. नाल्या प्लास्टिक तसेच कचर्याने तुंबल्यामुळे सांडपाणी रस्त्यावर वाहत होते. त्यामुळे रस्ते जलमय झाल्याचे चित्र दिसून येत होते.