अमरावती: धारणी प्रकल्प कार्यालयांतर्गत येणाऱ्या टिटंबा येथील शासकीय आश्रमशाळेतील ६० विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी आश्रमशाळेचे अधीक्षक संदीप गोळे यांना निलंबित करण्यात आले आहे. मुख्याध्यापक एम. पी. भागवत यांना 'कारणे दाखवा' नोटीस बजावून त्यांची बदली करण्याची कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे.
दरम्यान, टिटंबानंतर बिजुधावडी, सुसर्दा व सावलीखेडा येथील आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांनाही जेवणातून विषबाधा झाल्याची माहिती समोर आली आहे. सर्व बाधित विद्यार्थ्यांवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. धारणी प्रकल्प कार्यालयांतर्गत येणाऱ्या टिटंबा येथील शासकीय आश्रमशाळेत २५ जुलै रोजी विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याची घटना समोर आली. टिटंबा येथील विषबाधित विद्यार्थ्यांची संख्या ६० पर्यंत पोहोचली असून, या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अधिक्षक संदीप गोळे यांना तातडीने निलंबित करण्यात आले आहे. तसेच मुख्याध्यापक एम. पी. भागवत यांना 'कारणे दाखवा' नोटीस बजावण्यात आली असून, त्यांची या शाळेतून बदली करण्यात येणार आहे.
खासदारांची भेट अन् तपासणीचे आदेश
खासदार बळवंत वानखडे यांनी उपजिल्हा रुग्णालयात जाऊन उपचार घेत असलेल्या विद्यार्थ्यांची चौकशी केली. तसेच टिटंबा आश्रमशाळेला भेट देऊन पाहणी केली असता, विद्यार्थ्यांनी जेवणाबाबतच्या अनेक तक्रारी आणि समस्यांचा पाढा वाचला. यावर खासदार आणि लोकप्रतिनिधींनी मुख्याध्यापकांसह अधीक्षकांची कानउघाडणी केली.
भोजन वाटप करताना सेंट्रल किचनमधील कर्मचाऱ्यांकडून अथवा शाळा प्रशासनाकडून काय चूक झाली, याबाबत चौकशी करण्यात येणार आहे.-सिद्धार्थ शुक्ला (प्रकल्प अधिकारी, धारणी)